चाळीसगाव : तालुक्यातील दाभाडा येथील शेतकरी दिगांबर खातखिडे यांचा मोठा मुलगा मंगेश दिगांबर खातखिडे याने राहत्या घरी रविवारी ( दि . ९ ) दुपारी तीन वाजेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली . गेल्या दोन महिन्यापासून होणाऱ्या अतिवृष्टीने ४ एकर शेतातील कपाशीचे पीक वाया जाण्याची चिन्हे दिसत असल्याने व जवळचा पैसा संपल्याने तो अनेक दिवसांपासून विवंचनेत होता . दिगंबर खातखिडे यांच्या नावाने वडिलोपार्जित ४ एकर जमीन असून , ही जमीन त्यांचा मोठा मुलगा मंगेश हा सांभाळत होता . सततच्या नापिकी आणि या वर्षीचा अति पावसामुळे मंगेश यांचे पीक संपूर्ण पाण्याखाली होते . या कारणाने मंगेश आर्थिक संकटात सापडला होता . घरातील असलेल्या बकऱ्या विकून व उसनवारी पैसे घेऊन त्याने दोन वेळा फवारणी केली . मात्र पुन्हा ताण वाढून कपाशी ताणाखाली गेली होती . आता पीक वाचवण्यासाठी पैसे कुठून आणावे , या विवंचनेत रविवारी दुपारी मंगेशने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली . मंगेशच्या मागे आई - वडील आणि एक भाऊ असा बराच परिवार आहे