राजापूर : राज्य शासनाने सहकार संस्थांच्या निवडणुकांना दिलेली स्थगिती उठविली आहे. त्यामुळे कोरोना महामारीमुळे रखडलेल्या आणि मुदत संपलेल्या सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका येत्या काही दिवसांमध्ये जाहीर होणार आहेत. त्यामध्ये तालुक्यातील राजापूर अर्बन बँक, राजापूर तालुका खरेदी-विक्री संघासह चौथ्या टप्प्यातील 11 संस्थांचा समावेश आहे.
संचालक मंडळाच्या मुदती संपलेल्या तालुक्यातील सहकारी संस्थांच्या पहिल्या टप्प्यामध्ये सोळा संस्थांच्या निवडणुका झाल्या. दुसऱ्या टप्प्यामध्ये एकही संस्था नव्हती. मात्र, तिसऱ्या टप्प्यामध्ये 61 संस्थांच्या निवडणुका झाल्या. चौथ्या टप्प्यातील अकरा संस्थांच्या निवडणुका शासनाने दिलेल्या स्थगितीमुळे थांबलेल्या होत्या. मात्र, शासनाने आता स्थगिती उठविल्याने सहकार निवडणूक
प्राधिकरणाकडून या निवडणुकांचा कार्यक्रम येत्या काही दिवसांमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे.
अनेक सहकारी संस्थांच्या संचालक मंडळाच्या मुदती संपल्याने त्यांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली होती. त्यातून, तीन टप्प्यामध्ये काही संस्थांच्या निवडणुका झाल्या. मात्र, कोरोना महामारीने थैमान घातल्याने सहकारी संस्थांच्या निवडणुकांना शासनाकडून स्थगिती देण्यात आलेली होती. त्यामध्ये सहकारी संस्थाच्या निवडणुकांचाही समावेश होता. मात्र, कोरोना ज्वर कमी झाल्याने शासनाकडून निवडणुकांना दिलेली स्थगिती आता उठविली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये सहकार निवडणूक प्राधिकरणाकडून निवडणुका जाहीर करून प्रक्रिया जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.