बीड (प्रतिनिधी) धम्म म्हणजे निती, निती म्हणजे धम्म, धम्म हा आचरणात आहे, तुम्ही दुसऱ्याला सुख द्या म्हणजे तुम्ही सुखी व्हाल, तसेच पंचशीलाच्या पालनातच विश्वाची शांती आहे. असे पूज्य भिक्खु सुमणवण्णो महाथेरो यांनी आपल्या देसनेत धम्म परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी प्रतिपादन केले. प्रियदर्शी धम्म संस्कार शिक्षण संस्था बीड, सर्व बौद्ध उपासक - उपासिकांनी तिसरी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद डाँ. भदंत आनंद कौसल्यायन नगर, मौजे शिवनी ता.जिल्हा बीड येथे पूज्य भिक्खु डॉ. उपगुप्त महाथेरो, पूर्णा यांच्या मार्गदर्शनाखाली पूज्य भिक्खु धम्मशील यांनी 66 व्याधम्मचक्र अनुप्रवर्तन दिनी आयोजित केली होती. याप्रसंगी सामाजिक न्याय भवन येथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र अस्थिकलशाची भव्य धम्म मिरवनुक काढण्यात आली. धम्म मिरवनुकित सुशोभित रथात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र अस्थिकलशाचे शहरात ठीक ठिकाणी समाज बांधवांनी पुष्पवर्षाव करुन अभिवादन केले. धम्म मिरवनुक सामाजिक न्याय भवन, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, बलभीम चौक, टिळक रोड, सुभाष रोड मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे डाँ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले व बुद्ध वंदना घेण्यात आली.नंतर नाळवंडी मार्गे शिवनी येथे धम्म मिरवनुक नेण्यात आली. धम्म परिषदेच्या भव्य अशा मंडपामध्ये शाहीर प्रा. दीपक जमदाडे व संच यांचा भीम बुद्ध गीताचा सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला होता. डॉ. भदंत आनंद कौसल्यायन नगर येथे भिक्खु डॉ.इंदवंस्स महाथेरो यांच्या हस्ते धम्मध्वजारोहण संपन्न झाले. तथागतांना पुष्प तर डाँ. बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पहार व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र अस्तिकलशाला पुष्पमाला अर्पण करून प्रमुख पाहुणे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, तहसीलदार सुहास हजारे व धम्म परिषदेचे स्वागत अध्यक्ष मा. अनिल सावंत यांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले. पूज्य भिक्खु सुमणवण्णो यांनी त्रिसरण-पंचशील देउन धम्म परिषदेचे उद्घाटन केले. पुढे ते आपल्या देसनेत संबोधित करताना म्हणाले की, निसर्गाला तुम्ही जे द्याल तेच तुम्हाला मिळते, जे द्याल तेच परत येते, केवळ दान दिल्याने मनुष्य श्रीमंत होत नाही तर योग्य ठिकाणी दान केल्याने माणूस श्रीमंत होतो जे जे संपर्कात येतात त्यांना सुखी ठेवा. हे तथागतांच्या जीवनातील अनेक उदाहरणे देऊन स्पष्ट केले. आपल्या प्रस्ताविकात प्रा. रोडे यांनी डाँ. भदंत आनंद कौसल्यायन नगर मौजे शिवनी येथे येणा-या अडी-अडचणी मांडल्या त्या सोडविण्याचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले बीड जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी आश्वासन दिले.

      धम्म परिषदेत उपस्थित असलेले पूज्य भिक्खु ज्ञानरक्षित थेरो, पूज्य भिक्खु पय्याबोधी थेरो नांदेड, आणि पूज्य भिक्खु महावीरो थेरो अहमदपूर, पूज्य भिक्खु एम. धम्मज्योति थेरो औरंगाबाद यांनी आपल्या देसनेतून उपस्थितांना सम्राट अशोक विजया दशमीचे महत्व आणी त्रिसरण-पंचशील, अष्टांगिक मार्ग दहा पारमिताचे पालन करणे कसे महत्त्वाचे आहे व तोच कसा दुःख मुक्तीचा मार्ग आहे हे अनेक उदाहरणे देऊन स्पष्ट केले. धम्म परिषदेकरिता भोजन व खीरदान परेश मोरे, रमेश गंगाधरे व अल्काताई सुमित डोंगरे यांनी केली. तर मौजे शिवनी येथील सर्व समस्त धम्म बांधव भगिनी व संस्थेचे सर्व सदस्य यांनी परिश्रम घेतले धम्म परिषदे करता पंचक्रोशीतील हजारो उपासक-उपासिका, बालक-बालिकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डाँ. मनोहर शिरसट यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. राम गायकवाड यांनी व्यक्त केले व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.