परभणी,दि.७ (प्रतिनिधी): जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये 'समान संधी केंद्र' स्थापन करण्यात येत असून, आज परभणी येथील शारदा महाविद्यालयात स्थापित करण्यात आलेल्या समान संधी केंद्राचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव दि. रा. डिंगळे यांचे हस्ते उदघाटन करण्यात आले. यावेळी समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त गीता गुठ्ठे, शारदा महाविद्यालयाचे प्राचार्य व शिक्षक व इतर कर्मचारी यांची उपस्थिती होती. 

 जिल्ह्यातील प्रत्येक महाविद्यालयातील मागासवर्गीय मुला/मुलींना शिष्यवृत्ती / शिक्षण शुल्क, परिक्षा शुल्क इत्यादी योजना व स्पर्धा परिक्षा मार्गदर्शनासोबतच उदयोजकता, व्यवसाय, रोजगार निर्मीतीसाठी, आर्थीक न्यायासाठी मार्गदर्शन - संवाद अभियान तसेच युवा सेवा कार्यक्रम सुरु करण्याकरिता महाविद्यालयांमध्ये समान संधी केंद्र (Equal Opportunity Center) स्थापन करणेबाबत समाज कल्याण आयुक्तालय यांनी निर्देश दिलेले आहे. 

             यावेळी सचिव दि. रा. डिंगळे म्हणाले की, या समान संधी केंद्राद्वारे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन, उद्योजकता इ. सोबतच सामाजिक न्याय विभागाच्या सर्व योजनाची माहिती देणे अपेक्षित असल्याचे उपस्थतीतांना सांगीतले. तसेच केंद्रामधून विद्यार्थ्यांचे कौशल्य विकासाचे कार्यक्रम राबवून त्यांना विद्यार्थी दशेतच सक्षम बनविणे आवश्यक असल्याचे सांगून समान संधी केंद्रास पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.