केज :- केज तालुक्यातील आवसगाव येथील रस्ते दुरुस्तीच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या नागरिकांनी बांधकाम विभागाने रस्ता दुरुस्तीचा प्रस्ताव तयार करून तो वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविल्या नंतर दोन दिवसानंतर उपोषण मागे घेतले.
या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील आवसगाव येथून जाणारा आवसगाव ते सावळेश्वर आणि आवसगाव ते बनसारोळा हे दोन रस्ते दुरुस्त करण्यात यावेत या मागणीसाठी दि. ६ ऑक्टोबर रोजी येथील युवा कार्यकर्ते प्रदीप काळे आणि अविनाश साखरे यांच्या नेतृत्वाखाली ओंकार शिनगारे, सुजय शिनगारे, परमेश्वर साखरे आणि उत्तरेश्वर साखरे यांच्यासह युवक उपोषणाला बसले होते. दोन दिवसांपासून त्यांचे उपोषण सुरू होते दरम्यान या प्रकरणी शेतकरी कामगार पक्षाचे भाई मोहन गुंड, स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे, शिवसंग्रामचे डॉ. खोडसे आणि भारतीय मराठा महासंघाचे दत्ता शिनगारे यांनी उपोषणार्थी आणि संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून तडजोड घडवून आणली. त्या नंतर नायब तहसील बांधकाम विभागाचे भिसे यांनी सदर रस्ते दुरुस्तीचा प्रस्ताव कार्यकारी अभियंत्याला पाठविला असल्याचे त्या बाबतचे पत्र त्यांनी उपोषणार्थी यांना दिले. त्यावर उपोषणकर्ते यांचे समाधान झाले.
नायब तहसीलदार लक्ष्मण धस यांच्या हस्ते उपोषणार्थीनी लिंबू पाणी घेऊन उपोषण सोडले.
*४८ लक्ष रु. चा दुरुस्तीचा प्रस्ताव :-* जिल्हा परिषद बांधकाम, उपअभियंता कार्यालयाने सावळेश्वर ते आवसगाव आणि आवसगाव ते बनसारोळा या दोन रस्त्यासाठी एकूण ६ कि. मी. अंतराच्या तात्पुरत्या दुरुस्ती व डागडुजीसाठी एकूण ४८ लक्ष रु. चा प्रस्ताव कार्यकारी अभियंता यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. मंजुरी मिळताच दुरुस्तीच्या कामाला सुरुवात होणार आहे.