रत्नागिरी : डॉ. निमकर्स कोंकण नेस्ट रिसॉर्टच्या वतीने आयोजित गणपती आरास व सजावट स्पर्धेमध्ये देशभक्तीला सलाम करणाऱ्या रत्नागिरी तालुक्यातील पावस शेडगेवाडी येथील घाटकर कुटुंबीयांचा देखावा अव्वल ठरला आहे.
डॉ. निमकर्स कोंकण नेस्ट रिसॉर्टचे चालक डॉ. चंद्रशेखर निमकर आणि त्यांच्या टीमने रत्नागिरीकरांसाठी यंदाच्या गणेशोत्सवामध्ये तालुकास्तरीय गणपती आरास व सजावट स्पर्धेचे आयोजन केलं होतं. या स्पर्धेला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद प्राप्त झाला. अनेक गणेश भक्तांनी आकर्षक गणपती सजावटीचे व्हिडिओ या स्पर्धेसाठी पाठवले होते. वेगवेगळ्या प्रकारच्या संकल्पना मांडून श्री गणेशा सोबत सामाजिक, पौराणिक, ऐतिहासिक विषयावरील देखावे तयार करून रत्नागिरीकरांनी आपली कल्पकता यातून दाखवली होती. या व्हिडिओ मधूनच पहिले तीन क्रमांक काढण्यात आले आहेत. त्यामध्ये पावस येथील शेडगेवाडी येथील घाटकर कुटुंबीयांनी तयार केलेला कारगिल युद्ध आणि उरी सर्जिकल स्ट्राइकचा देखावा हा प्रथम क्रमांकाचा ठरला आहे. यातून देशसेवेला प्राधान्य देत सैनिकांच्या योगदानाला यातून सलाम करण्यात आलेला हा जीवंत देखावा पहिला आला आहे.
या स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस हे तालुक्यातील गोळप नवेदरवाडी येथील विनोद गोविंद जोशी यांच्या सजावटीला प्राप्त झाले आहे 'मोबाईल अतिरेकामुळे होणारे दुष्परिणाम' या सध्याच्या जीवनात महत्वाच्या असलेल्या विषयावर त्यांनी केलेली सजावट माहितीपूर्ण होती. तर तिसरा क्रमांक हा रत्नागिरी तालुक्यातील मठ बंडबेवाडी येथील संजय बंडबे यांच्या 'पक्षी आणि प्राणी वाचवा, पृथ्वी वाचवा' या विषयावर केलेल्या सजावटीला प्राप्त झाला आहे. अत्यंत सुंदर सजावट, संपूर्ण माहिती देऊन करण्यात आली होती. त्यात हा विषय सध्याचा महत्वाचा विषय असून समाजाने त्याचे गांभीर्य समाजावे हा प्रयत्न दिसून आला.
या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून अभिनेते स्वानंद देसाई आणि पत्रकार अनघा निकम मगदूम यांनी काम पाहिले. तर रत्नागिरीतील डिजिटल मार्केटिंग क्षेत्रातील नंदाई डिजिटल मार्केटिंग या टीम सोबत व्यवस्थापन करण्यात आलं होतं. लवकरच बक्षीस वितरण कार्यक्रम करण्यात येणार आहे.