रत्नागिरी : याआधी विद्युत इंजिनसह धावण्याच्या अंदाजित तारखा जाहीर होऊनही विद्युत इंजिन उपलब्धतेअभावी काही दिवस डिझेल इंजिनवरच धावलेल्या कोकणकन्या तसेच मांडवी मांडवी एक्सप्रेससाठी अखेर इलेक्ट्रिक लोको उपलब्ध झाली आहेत. या दोन्ही गाड्या शनिवार दि. ८ ऑक्टोबरपासून विजेवर धावणार आहेत. रेल्वेनने यासाठी संबंधित विभागांना गुरुवारी सायंकाळी तसा पत्रव्यवहार केला आहे.

कोकण रेल्वेच्या संपूर्ण मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाल्यामुळे गेल्या वर्षापासून मालगाड्या विद्युत इंजिनवर चालवलल्या जात आहेत. गेल्या महिन्यात दिनांक 15 तसेच 20 सप्टेंबरपासून कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या काही प्रवासी गाड्या या विद्युत इंजिनवर चालवल्या जात आहेत. कोकणकन्या तसेच मांडवी एक्सप्रेस देखील विद्युत इंजिनसह चालवण्याची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. मात्र, मागील काही दिवस इलेक्ट्रिक इंजिनची उपलब्धता होऊ न शकल्यामुळे या दोन्ही गाड्यांचा विजेवरील प्रवास लांबणीवर पडला होता. मात्र, या दोन्ही गाड्यांसाठी रेल्वेकडून WAG 5 या श्रेणीतील विद्युत इंजिन उपलब्ध झाल्यामुळे अखेर या गाड्या शनिवार दिनांक ८ ऑक्टोबरपासून विजेवर धावणार आहेत. दिनांक ७ ऑक्टोबर रोजी कोकणकन्या तसेच मांडवी एक्सप्रेसचा डिझेल इंजिनवरील प्रवास अंतिम असणार आहे.

१०१११/१०११२ मडगाव- सीएसएमटी- मडगाव कोकणकन्या एक्सप्रेस तसेच १०१०३/१०१०४ मडगाव सीएसएमटी- मडगाव या दोन्ही गाड्या शनिवार दिनांक ८ रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनसहून जेव्हा मडगावला येण्यासाठी सुटतील तेव्हापासून त्या विद्युत इंजिनसह धावतील. तिथून पुढे या दोन्ही विद्युत इंजिनसह धावणार आहेत.