ई-केवायसीत रत्नागिरी जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर

रत्नागिरी : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या लाभार्थीचे ई केवायसी अर्थात आधारकार्ड लिंक करण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाला यश आले आहे. जिल्ह्यात 94 टक्के ई केवायसीचे काम पूर्ण झाले असून, रत्नागिरी जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. 

जिल्ह्यात रत्नागिरी आणि संगमेश्वर तालुक्यात शंभर टक्केहून अधिक काम झाले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात पीएम किसानचा लाभ देण्यासाठी लाभार्थ्यांकडून ई-केवायसी करण्याची कार्यवाही जिल्हा प्रशासन स्तरावरून हाती घेण्यात आलेली होती. गेले सुमारे दीड महिना या मोहिमेला अधिक गती मिळाली होती. अगदी गणेशोत्सवाच्या काळामध्ये तहसीलदार कार्यालय, ग्रामपंचायती ई केवायसीसाठी सुरू ठेवण्यात आल्या होत्या. त्यासाठी वारंवार संबंधित लाभार्थ्यांना महसूल विभागस्तरावरून केवायसी करण्यासाठी आवाहन करण्यात येत होते. त्यानुसार गावागावात संबंधित लाभार्थ्यांच्या यादी तयार करून तलाठी, ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांकडून शोध घेण्यात आला. केंद्र शासनाने त्यासाठी वेळोवेळी मुदत वाढवून दिलेली होती.

जिल्ह्यात पी. एम. किसानचे 1 लाख 69 हजार 902 लाभार्थी संख्या आहे. त्यामध्ये शुक्रवार 30 सप्टेंबरपर्यंत देण्यात आलेल्या मुदतीत 1 लाख 60 हजार 87 लाभार्थ्यांनी ई केवायसी केल्याची नोंद झालेली आहे. जिल्ह्याने सुमारे 94 टक्के ही कामगिरी फत्ते केलेली आहे. आता केवळ सुमारे 6 टक्के कार्यवाही शिल्लक राहिलेली आहे.