चिपळूण : पोफळी ग्रामपंचायतीची निवडणूक सतरा वर्षानंतर अखेर बिनविरोध झाली. शुक्रवारी अर्ज मागे घेण्यासाठी शेवटची मुदत असताना सरपंच पदासाठी एक, तर सदस्य पदासाठी अर्ज सादर केलेल्यांपैकी तिघांनी माघार घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली.

पोफळी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी काही दिवसापासून सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठका सुरू होत्या. यातून 13 प्रभागासाठी 13 उमेदवार आणि सरपंचपदासाठी एक उमेदवार निश्चित करण्यात आला होता. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार हे निश्चित झाले होते. मात्र प्रभाग क्रमांक तीन मधील 3 जागांसाठी 4 अर्ज दाखल झाले होते. प्रभाग क्रमांक १ मध्ये सुजाता घाणेकर यांनी, तर प्रभाग क्रमांक ३ मध्ये अनंत भैरवकर यांनी डमी अर्ज भरला होता. उमेदवारी न मिळाल्याने महादेव चव्हाण यांनी प्रभाग क्रमांक 3 मधून अर्ज भऱला होता. सरपंच पदासाठी अनंत भैरवकर यांनी डमी उमेदवारी अर्ज सादर केला होता. अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी चव्हाण यांच्यासह डमी उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे पोफळी ग्रामपंचायत निवडणूक अखेर बिनविरोध झाली.

यापूर्वी 2005 मध्ये शिवसेना नेते भास्कर जाधव शिवसेना सोडून राष्ट्रवादीत आले. त्यानंतर पोफळी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाली होती. नंतर झालेल्या सार्वत्रिक निवडणूकीत या भागातील शिवसेनेचे नेते चंद्रकांत सुवार यांनी ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळवले. त्यानंतर मागील पाच वर्ष राष्ट्रवादीचे माजी पंचायत समिती सदस्य बाबू साळवी यांचे ग्रामपंचायतीवर वर्चस्व होते. यावेळी साळवी आणि सुवार या दोन्ही नेत्यांनी एकत्र येवून ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला.