गुहागर : तालुक्यातील अडुर येथे अंगणवाडी केंद्र अडुर पड्याळवाडी व नवज्योत ग्रामसंघ अडुर यांच्या संयुक्त विद्यमाने गुहागर प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी पी. पी. केळस्कर, मुख्यसेविक अंकिता महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेला राष्ट्रीय पोषण आहार अभियान समारोप कार्यक्रम गुरुवार दिनांक २९ सप्टेंबर २०२२ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सदर कार्यक्रमाप्रसंगी रांगोळी प्रदर्शन, पाककृती प्रदर्शन, सुदृढ बालक स्पर्धा, वृक्ष लागवड, बेटी बचाओ बेटी पढाओ, ग्रहभेटी देऊन महिलांना मार्गदर्शन, जनजागृतीपर प्रभात फेरी, त्याचबरोबर कोकणातील पारंपरिक टिपरीनृत्य, पोषण आहार विषयी गीत, तसेच महिलांनी विविध विषयांवर प्रबोधात्मक कार्यक्रम सादर केले. तसेच श्रद्धा दणदणे यांनी कार्यक्रमास्थळी सुबक अशी रांगोळी रेखाटन करून उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्यावतीने अंगणवाडीतील मुलांना फळहार म्हणून केळी वाटप करण्यात आली. तर रेश्मा दणदणे यांनी चुरमुरे लाडू वाटप केले. अडुर उपकेंद्र प्रमुख पाटेदार सर यांचे उपस्थितांना पोषण आहार विषयी बहुमूल्य असं मार्गदर्शन लाभले.
सदर कार्यक्रमाला पड्याळवाडीचे विद्यमान अध्यक्ष -अशोक तुपट , गावकर-अनंत हळये, सरपंच- शैलेजाताई गुरव, महिला मंडळ अध्यक्षा -इंदिरा आग्रे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ, कोंड कारूळ व बुधळ येथील अंगणवाडी सेविका व मदतनीस तसेच पड्याळवाडी बचतगटातील महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष म्हणजे लोकसहभागातून व काही ग्रामस्थांकडून आर्थिक योगदान मिळालं. कार्यक्रमाची सांगता समारोप अध्यक्ष यांच्या भाषणाने व दांडिया नृत्याने करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अंगणवाडी सेविका श्रुतिका देवळे यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पड्याळवाडी महिला मंडळाचे विशेष सहकार्य लाभले.