दापोली : वन्यजीवांचे संरक्षण व संवर्धन करण्याबाबत जागृती रुजवण्यासाठी दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात वन्यजीव सप्ताह साजरा केला जातो. या वन्यजीवांचा जीवनक्रम समजून घेण्यासाठी आणि त्यांच्याबद्दल असणारे गैरसमज दूर करण्यासाठी दापोली सायकलिंग क्लब आणि वन परिक्षेत्र कार्यालय दापोली तर्फे रविवार दि. २ ऑक्टोबर २०२२ रोजी सायकलफेरी काढून जनजागृती करण्यात आली.

आझाद मैदानातून सुरु झालेली सायकल फेरी डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक- एव्हरेस्टवीर सुरेंद्र चव्हाण चौक- वनशास्त्र महाविद्यालय, डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ- नर्सरी रोड- परिक्षेत्र वन अधिकारी कार्यालय दापोली- आझाद मैदान अशा ६ किमी मार्गावर झाली. यामध्ये सर्व वयोगटातील नागरिक, वनविभागातील अधिकारी, सर्पमित्र, प्राणीमित्र, पक्षीमित्र इत्यादी सायकल चालवत सहभागी झाले होते. यामध्ये डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ वनशास्त्र विभागाचे डॉ सतिश नारखेडे, डॉ अजय राणे, डॉ विनायक पाटील, अपर्णा पित्रे जॉइस व सहकारी, परिक्षेत्र वन अधिकारी वैभव बोराटे, वनपाल साताप्पा सावंत, सुरेश उपरे, वनरक्षक सुरज जगताप, शुभांगी गुरव, शुभांगी भिलारे, अशोक ढाकणे, परमेश्वर डोईफोडे, प्राणीमित्र, सर्पमित्र यांनी सहभागी होऊन वन्यजीवांविषयी जनजागृती करत मार्गदर्शन केले. जंगलातील गमती जमती सांगितल्या.

विद्यापीठाच्या जैवविविधता उद्यानात डॉ. विनायक पाटील, अपर्णा पित्रे व सहकारी यांनी पक्षी निरीक्षणाचा वर्ग घेतला. चरक औषधी वाटिका, नक्षत्र वन, बांबू उद्यान इत्यादी परिसरात फिरणे झाले. यामध्ये ५० पेक्षा अधिक प्रजातीचे अनेक पक्षी दिसले, त्यांचे वेगवेगळे आवाज, कॉल अनुभवता आले. वनशास्त्र महाविद्यालयात सुरु असलेले वन्यजीव अभयारण्य याविषयक फोटोग्राफी, चित्रकला, पोस्टर, स्केचेस, कविता याबद्दलचे प्रदर्शन पाहण्यात आले. सर्वांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे मिळाली. आपला देश जैवविविधतेने नटलेला आहे. सर्वांनी वन्यजीव संरक्षण आणि संवर्धन करण्याची शपथ घेतली.

सायकल चालवण्याचे अनेक फायदे आहेत. या सायकल फेरीचे नियोजन करण्यात सूरज शेठ, अंबरीश गुरव, विनय गोलांबडे, वरुण महाजन, मृणाल मिलिंद खानविलकर, उत्तम पाटील, आकाश तांबे, झाहीद दादरकर, अमोद बुटाला, सर्वेश बागकर, राहुल मंडलिक इत्यादींनी मोलाची भूमिका बजावली. दैनंदिन जीवनात सायकलचा वापर अधिक करा आणि इतरांनाही प्रेरित करा असे आवाहनही आयोजकांनी केले आहे.