संगमेश्वर : तालुक्यातील यशवंत शिक्षण संस्था संचलित मॉडर्न इंग्लिश स्कूल बुरंबाड येथे नवरात्री उत्सव उत्साहात पार पडला. भारतीय संस्कृतीचा वारसा जपत विद्यार्थी तसेच प्रशालेतील शिक्षकांनी विविध उपक्रमातून उत्सव थाटामाटात साजरा केला. नवरात्रीचे वैशिष्ठ्य असलेले गरबा नृत्य व दांडिया नृत्य, त्यासोबतच फुलांची आरास करून सजवलेला भोंडला इत्यादींचा यात समावेश होता.
विद्यार्थ्यांनी गटागटाने सहभाग घेऊन रंगीबेरंगी फुलांचे नक्षीदार भोंडले सजवले. छोट्या कलाकारांनी काढलेला बाहुलीचा भोंडला कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरला. यानंतर विद्यार्थ्यांनी विविध मराठी तसेच हिंदी गाण्यांच्या तालावर आपला गरबा व दांडिया चा फेर धरत कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला.
शाळेच्या उपमुख्याध्यापिका सौ.सिमी खोत सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे छायाचित्रण ओंकार मोहिते व वृत्तांकन किर्ती दामले यांनी केले.