डोक्यात दगड घालून मित्राचा खून करणाऱ्याला जन्मठेपेसह एक हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा सत्र न्यायाधीश जे. जी. डोरले यांनी सुनावली. पोपट शिवराज गायकवाड (वय50) याच्या खून प्रकरणी आरोपी अब्दुल कय्युम युसुफ अन्सारी (वय39, रा. आव्हाळवाडी, हवेली) शिक्षा सुनावण्यात आली असून, या प्रकरणी पोपट यांची पत्नी काशीबाई यांनी लोणीकंद पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली होती. आरोपी चालवीत असलेले दुकान पोपट याने चालवण्यास घेतल्याने त्याने मित्राचा खुन केला. आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी अशी मागणी अतिरिक्त सरकारी वकील वामन कोळी यांनी न्यायालयाला केली होती त्यानुसार न्यायालयाने ही शिक्षा सुनावली. आरोपी अब्दुल आणि मयत पोपट हे दोघेही मित्र होते. संतोष नेपाळी यांचे दुकान पूर्वी अब्दुल चालवीत होता. त्यानंतर ते दुकान पोपट याने चालवण्यासाठी घेतले. दुकान चालवण्यास घेतल्याच्या कारणावरून अब्दुल याने पोपट याचा खून केला अशी फिर्याद होती.