चिपळूण : खेर्डी येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या व्यवस्थापनाला शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षच्या वतीने इशारावजा निवेदन देण्यात आले. येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या अधिकारी व कर्मचारी वर्गाच्या वर्तणुकीबाबत असंख्य तक्रारी ग्राहक संरक्षण कक्षच्या पदाधिकयांकडे आल्या होत्या ह्या पार्श्वभूमीवर शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षच्या पदाधिकऱ्यांनी खेर्डी शाखेच्या शाखाधिकारी यांना निवेदन दिले. या निवेदनात बँकेतील सर्व कर्मचारी व अधिकारी यांनी बँकेच्या ग्राहकांशी राज्य शासनाच्या आदेशानुसार मराठी भाषेतच संवाद साधावा. ग्रामीण भागातून येणाऱ्या ग्राहकांना ताटकळत ठेऊ नये तसेच त्यांच्याशी अदबीने बोलावे. सदर बँकेतील खातेदार हे निवृत्ती वेतनधारक व महिला बचत गट आहेत मात्र ह्या सर्वांशी बँकेतील कर्मचारी, अधिकारी उपकाराच्या भावनेतून वागत असतात असले प्रकार थांबावेत, अशा सूचना सदर निवेदनात नमूद केल्या असून सदर निवेदनाची गांभीर्याने दखल न घेतल्यास शिवसेना पद्धतीने वठणीवर आणले जाईल, असा इशारा सदर निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
शाखाधिकारी सरनाईक यांच्यातीने उपशाखाधिकारी श्रीवास्तव यांनी स्वीकारले, तर शाखाधिकारी सरनाईक यांनी दूरध्वनीद्वारे सदर निवेदनाची दखल घेतली असून निवेदनात नमूद केलेल्या सूचनांची अंमलबजावणी निश्चित केली जाईल अशी हमी दिली. या वेळी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष जिल्हाप्रमुख संतोष सुर्वे, कक्षतालुकप्रमुख सूरज कदम, कक्ष कार्यालय प्रमुख अविनाश सावंत, कक्ष शहरप्रमुख उमेश गुरव, उपतालुकाप्रमुख विजय जाधव, कक्ष विभाग प्रमुख अजित पवार, सुशील मोरे, सौरभ फागे, महेंद्र आमरे, अनिल राक्षे उपस्थित होते.