रत्नागिरी : शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. शहरालगतच्या मिरजोळे एमआयडीसी येथील एका दुकानात तरूणीला चाकूचा धाक दाखवून लूटमार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आह़े. या प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. शाहीद सादीक मुजावर (32, धनजीनाका रत्नागिरी) व फुरकान यासीन फणसोपकर (30, कोकणनगर रत्नागिरी) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत़. या दोघांना आज शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने 4 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिरजोळे एमआयडीसी येथे राहुल स्नॅक दुकानात 28 सप्टेंबर रोजी 17 वर्षीय तरूणी एकटी असल्याचे पाहून दोन संशयित दुचाकीवरून दुकानात आल़े. आपण पोलीस आहोत असे सांगितले. दुकानात गुटखा विक्री होत असल्याची माहिती मिळाली आह़े. त्याची तपासणी करावयाची आहे, अशी बतावणी त्यांनी केल़ी. दुकानातील तरूणी विरोध करत असल्याचे लक्षात येताच शाहीदने तरूणीला धक्का देत जबरदस्तीने दुकानात प्रवेश केल़ा. फुरकानने स्वत:कडील धारदार चाकू काढत ओरडलीस तर ठार मारून टाकू अशी धमकी दिल़ी. शाहीदने दुकानाच्या गल्ल्यातील 4 हजार रूपये काढून घेतले व दोन्ही संशयितांनी दुचाकीवरून पोबारा केल़ा.

या प्रकरणी तरूणीने रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत तक्रार दाखल केली होत़ी. त्यानुसार पोलिसांनी भादंवि कलम 397,170,506 सह 34 नुसार गुन्हा दाखल केल़ा. पोलिसांच्या तपासात हा गुन्हा शाहीद व फूकरान यांनी केल्याचे निष्पन्न झाल़े. त्यांच्याकडून एक चाकू, ज्युपिटर गाडी व रोख रक्कम 1 हजार हस्तगत करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.