रत्नागिरी : भाजपच्या राजवटीला कंटाळून एकनाथ शिंदे यांनीच एकेकाळी आवाज उठवला होता. जाचाला कंटाळून त्यांनी राजीनामाही दिला होता. त्यामुळे अशोक चव्हाण बोलले ते खरेच आहे. आत्ता जरी शिंदे भाजप जवळ असले तरीही त्यावेळी फडणवीसांच्या विरोधात आकांड-तांडव त्यांनीच केला होता. भाजपचा जाच कसा असतो, हे उघडपणे एकनाथ शिंदे यांनीच सांगितला होता. आता ते भाजपच्या जवळ कसे गेले ते ईडीचा डायरेक्टरच सांगू शकतात, असा टोला शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी लगावला आहे.
शिवसेना विरुद्ध शिंदे गट असा थेट सामना राज्याच्या राजकारणात रंगला आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरु असून रत्नागिरी दौर्यावर असलेले शिवसेनेचे खासदार राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच भाजपच्या त्रासाला कंटाळून एकेकाळी वाचा फोडली होती. आता ते कस जवळ गेले याचे उत्तर ईडीचे डायरेक्टर देतील असा टोला लगावला. तर राऊत यांनी नारायण राणेंच्या बंडखोरीवेळी रामदास कदमांनी घेतलेल्या भुमिकेची आठवण करुन दिली. रामदास कदम यांची बडबड आम्ही गांभीर्यांने घेत नाही. शिवसेनेत गद्दारीची किड कुणी रुजवली असेल तर ते कदम यांनीच. नारायण राणे शिवसेना सोडताना राणेंच्या बंगल्यावर रामदास कदम राहिले होते. त्यावेळी शिवसेनेकडून फुटून राणे गटात या असे अनेकांना सांगणार्यात रामदास कदम आघाडीवर होते. एका खासगी कार्यक्रमात नारायण राणेंनी याचा गौप्यस्फोटही केला होता. तेव्हा राणेंनीच त्यांच्या निष्ठेचे वस्त्रहरण केले. त्यामुळे आता शिवसेनेला शहाणपणा शिकवण्याचा प्रयत्न करत असतील तर तो करू नये असा इशारा खासदार राऊत यांनी दिला.
निवडणुक आयोगाकडील सुनावणीविषयी बोलताना खासदार राऊत म्हणाले, अधिकृत शिवसेनेने निवडणुक आयोगाकडे अधिकृतपणाचे पुरावे सादर केले आहेत. पक्षाच्या चिन्हाबाबत आणखीही पुरावे सादर केले जातील. पक्षाच्या घटनेप्रमाणे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचाच शिवसेनेवर अधिकार आहे. फुटीर लोकांचा तो होवू शकत नाही. शिवसेनेची समांतर संघटना उभी केली तरी तो होवू शकत नाही. निवडणुक आयोगाकडे खरे खोटेपणा ठेवला जाईल. न्याय आम्हाला नक्की मिळेल. तर दसरा मेळाव्याच्या तयारीवर बोलताना ते म्हणाले, शिवसेनेच्या मेळाव्याला उत्फुर्तपणे येणार्याची संख्या आहे. त्याची तुलना इतर कोण करत असेल तर त्यांचा भ्रमनिसार होईल. शिवसेना ही बाळासाहेबांचीच आहे. शिवतीर्थावर जनसुमुदाय असेल, आम्ही लाखांचे आकडे सांगत नाही. पण येणारा जनसुमुदाय शिवतीर्थावर दिसेल. शिंदे हा गट आहे शिवसेना हा पक्ष आहे.