आष्टी (प्रतिनिधी) आष्टी तालुक्यातील दौलावडगाव येथिल पुजा अलंकार सराफा दुकानाचे मालक प्रमोद काका दिक्षीत व त्यांच्या पत्नी सविता दिक्षीत यांना बुधवार दिंनाक 28 सप्टेंबर 2022 रोजी सांयकाळी 7:30 वाजता दौलावडगाव ते करंजी असा मोटरसायकल वरून प्रवास करत असताना दौलावडगाव ते बारव रस्त्यावरील पिंपळगाव घाट याठिकाणी पाठीमागून मोटर सायकलवरुण आलेल्या तिघा अज्ञात तरुणांनी दीक्षित यांच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारहाण करून त्यांना खाली पाडले तसेच त्यांच्या पत्नीला देखील जबर मारहाण केली असून,डोक्याला गंभीर इजा झाली आहे. त्यांच्या जवळील रोख रकमेसह सुमारे सात ते आठ लाख रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने घेऊन चोरट्यांनी पळ काढला या घटनेमध्ये दीक्षित दांपत्य गंभीररित्या जखमी झाले असून परिसरातील नागरिकांनी त्यांना तात्काळ अहमदनगर येथे खाजगी रुग्णालयात दाखल केले.या घटनेचा अंभोरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दीक्षित दांपत्याला मारहाण करून त्यांच्याकडील रोख रकमेसह सोन्या चांदीचे दागिने लुटणाऱ्या अज्ञात चोरट्यांचा पोलिसांनी शोध घ्यावा व त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी अहमदनगर शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख रफीक शेख,युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रकाश शेलार,राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष जालिंदर वामन यांनी केली आहे.
घटनास्थळाची पाहणी करून जखमी दीक्षित दांपत्याचा जबाब नोंदविण्यात आला आहे. तपासाची चक्रे वेगाने फिरवून निश्चित आरोपींचा शोध घेऊ असे अंभोरा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रोहित बेंबरे यांनी म्हटले आहे.