रत्नागिरी सिव्हील हॉस्पिटल मधील डॉ. समीक्षा जाधव गंभीर
रत्नागिरी : मुंबई - गोवा महामार्गावर सावर्डे पासून 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या आगवे येथे मारुती अल्टो कार आणि टू व्हीलर यांच्यात अपघात झाला. अपघातानंतर कार 60 ते 70 फूट खोलदरीत नाल्यामध्ये कोसळली. अल्टो कार मधील दोन जण जखमी आहेत. यामध्ये रत्नागिरी सिव्हील हॉस्पिटल येथील मानसोपचार तज्ञ डॉ. समीक्षा जाधव या गंभीर आहेत तर पतीना किरकोळ दुखापत झाली आहे. तसेच टू व्हीलरचा चालक गंभीर जखमी. हा अपघात दुपारच्या सुमारास झाला.
सविस्तर वृत्त असे की, डॉ. समीक्षा जाधव या आपल्या पतीसह चिपळूण येथे एका कॅम्प साठी जात होत्या. यावेळी त्यांच्या गाडीला समोरून येणाऱ्या दुचाकीची धडक झाली. त्याला वाचविण्याच्या नादात डॉक्टरांची गाडी खोल दरीत कोसळली. यामध्ये डॉ. समीक्षा जाधव या गंभीर जखमी झाल्या. त्यांच्या डोक्याला, हाताला, पायाला गंभीर दुखापती झाल्या आहेत. त्यांना सावर्डे पोलिसांनी देरवन येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. त्यांच्यावर तातडीची शस्त्रक्रिया करण्यात येत आहे.
या अपघाताची माहिती मिळताच सावर्डे पोलीस दाखल झाले. तसेच आगवे येथील सह्याद्री युवा मंच आगवे चे सदस्य प्रसाद तिरुपनकर, विकास भंडारी, सुमित भंडारी, चिरंजीव भंडारी, धीरज भंडारी, सतीश निमुनकर, संकेत भंडारी, इत्यादी सर्वांनी पोलिसांच्या मदतीने व कालिकादेवी बचत गट रुग्णवाहिका यांच्या मदतीने जखमींना इस्पितळात पोहोचवले.