🔹तीन वर्षांनंतर रंगणार आतीषबाजी 🔹

गंगाखेड : येथील श्री साईसेवा प्रतिष्ठाणच्या दसरा महोत्सवाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. आतीषबाजीसह दहन करण्यासाठीच्या अपप्रवृत्तींच्या ५१ फुटी पुतळ्याच्या निर्माण कामाचा प्रारंभ आज करण्यात आला. तीन वर्षांच्या अवकाशानंतर गंगाखेडच्या गोदातटावर हा सोहळा रंगणार असून यामुळेच विशेष ऊत्साहात हा सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती संयोजक तथा प्रतिष्ठाणचे अध्यक्ष गोविंद यादव यांनी दिली आहे. 

गंगाखेडचा दसरा सर्वदूर प्रसिद्ध आहे. श्री बालाजींच्या रथ यात्रेस भाविकांची मोठ्या संख्येने ऊपस्थिती असते. या रथ परिक्रमेनंतर श्री साई सेवा प्रतिष्ठाणच्या वतीने करण्यात येणारे पुतळा ( रावण) दहन आणि नेत्रदिपक आतिषबाजी हा अबालवृद्ध, भाविकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. या सोहळ्यास पंचक्रोशीतील हजारो भाविकांची ऊपस्थिती असते. यावर्षी दसऱ्याच्या दिवशी सायंकाळी ६ वाजता हा सोहळा संपन्न होणार आहे. 

आज गंगाखेडच्या स्मशानभूमीत पुतळा बनवण्याच्या कार्याचा आरंभ प्रतिष्ठाणचे सचिव, अभियंता नागेश पैठणकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. या प्रसंगी संयोजक - अध्यक्ष गोविंद यादव, रमेश औसेकर, मनोज नाव्हेकर, जगदिश देशमाने, मुर्तीकार विठ्ठल भुसांडे, गजानन जोशी, मारोती गोरे, सुहास देशमाने, भारत गोरे, गंगाराममामा शंकुवाड, व्यंकट यादव, महेश परडे आदिंची ऊपस्थिती होती.