महान अशोक विजयादशमी रोजी माणगाव येथे सामूहिक मानवंदनेस एकत्र येण्याचे युवा बौद्ध धम्म परिषद चे आवाहन

बुधवार, दि. ०५ ऑक्टोबर २०२२ महान सम्राट अशोक विजयादशमी रोजी माणगाव ता. हातकणंगले जि. कोल्हापूर येथील सम्राट अशोक स्तंभास सामूहिक मानवंदना आणि अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील तमाम बौद्ध बहुजनांनी सहभागी व्हावे असे आवाहन युवा बौद्ध धम्म परिषद महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्य या धम्म संस्थेने केले आहे. माणगाव मध्ये एकत्र येण्याचा कृतीकार्यक्रम जनमाणसात रुजविण्यासाठी दरवर्षी अशोक विजयादशमी रोजी माणगाव येथे एकत्र येण्याचे आवाहन केले जाते. माणगाव धम्मवारी म्हणून प्रचलित झालेल्या या सोहळ्याला दरवर्षी विविध भागातून येणाऱ्या हजारो लोकांची उपस्थीती याठिकाणी असते. या कृतिकार्यक्रमाची पार्श्वभूमी सांगत असताना "राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी बहिष्कृतांची परिषद घेऊन डॉ॰ बाबासाहेब आंबेडकर यांना भारताचे नेते घोषित केले होते, या भागातील अपंग, महिला, लहान मुले, वयोवृद्ध, विद्यार्थी, नोकरदार, कष्टकरी, कामगार इत्यादी लोक रजा काढून, काम खाडे करुन अथवा इतर कारणांनी दीक्षाभुमीला दूरचा प्रवास करून जाऊ शकत नाहीत, मान्यवर कांशीराम यांनी माणगाव मधुन प्रेरणा घेतली व येथे आंतरराष्ट्रीय स्मारक बनविण्याचे स्वप्न जाहिर केले, माणगावला बहुजन समाजाच्या श्रद्धास्थानी बिंबविण्याची आवश्यकता आहे, माणगाव हे बौद्ध-बहुजनांचे प्रेरणास्थान म्हणून रूजवायचे आहे इत्यादी प्रांजळ उद्दिष्ट समोर ठेऊन ०८ जानेवारी (विश्व बौद्ध धम्म ध्वज दिन) २०१७ रोजी हुपरी, ता. हातकणंगले जि. कोल्हापूर येथे झालेल्या पहिल्या युवा बौद्ध धम्म परिषदेत सम्राट अशोक विजयादशमी रोजी सर्वांनी माणगाव येथे एकत्र येण्याचा ठराव करण्यात आला आहे. अशी माहिती युवा बौद्ध धम्म परिषद च्या राज्य कार्यकारिणीने दिली आहे. आरक्षणाचे जनक, धम्मधर, राजर्षी छत्रपती शाहू महाराज व संविधाननिर्माते, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, आधुनिक बुद्ध, डॉ॰ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कल्याणमैत्रीला अजरामर करायचे आहे, २०२० साली या कल्याणमैत्रीला शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत. तेंव्हा माणगाव धम्मवारी ही 'बौद्ध परंपरा' म्हणून रूजवूया असे आवाहनही त्यांनी केले आहे. या कृतीकार्यक्रमात निष्ठेने सहभागी होणाऱ्या बंधू भगिनीनी खालील नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.