बोरी(प्रतिनिधी)
येथे आयोजित केलेल्या महालक्ष्मी सजावट स्पर्धा २०२२ चे बक्षीस वितरण मंगळवारी (दि.२७) सायंकाळी ५ वाजता करण्यात आले. ग्रामपंचायतच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच निर्मलाताई चौधरी होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष प्रेक्षाताई भांबळे, जि.प.चे माजी उपाध्यक्ष अजय चौधरी, नगरसेविका आशाताई उबाळे, उपसरपंच शाहीनबी शेख रफीक, ग्रामपंचायत सदस्या सत्यभामा नितनवरे, बोरी प्रेस क्लबचे अध्यक्ष नेमिनाथ जैन, मराठी पत्रकार संघाचे तुकाराम सर्जे, अश्विनीताई चौधरी यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक व सूत्रसंचालन शशिकांत चौधरी यांनी केले.या स्पर्धेचे प्रथम बक्षीस मानाची पैठणी, चांदीचे करंडे व सन्मानचिन्ह प्रीती राजगोपाल लड्डा यांना देण्यात आले. तर द्वितीय बक्षीस मेघा रमण बिर्ला यांनी पटकावले. मानाची पैठणी व सन्मानचिन्ह देऊन त्यांना गौरविण्यात आले. तृतीय बक्षीस चांदीचे करंडे व सन्मानचिन्ह स्वाती दीपक भायेकर यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. उत्तेजनार्थ पाच महिलांना आकर्षक बक्षीस व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. सहभागी झालेल्या सर्वच महिलांना यावेळी सन्मानपत्र देण्यात आले. पर्यावरण, स्वच्छता व चालू घडामोडीवर आधारित देखावा हा विषय या स्पर्धेसाठी ठेवण्यात आला होता.
यावेळी मार्गदर्शन करताना अजय चौधरी म्हणाले की, माजी आ.विजयराव भांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांसाठी विविध आरोग्य विषयक मार्गदर्शन शिबिर, महिला बचत गटाची स्थापना आदि महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा प्रेक्षाताई भांबळे म्हणाल्या की, बोरी ग्रामपंचायतची सुसज्ज इमारत, नव्याने होऊ घातलेले जिजामाता उद्यान असो की महिलांसाठी राबविण्यात आलेल्या विविध योजना असो त्यांची सक्षमपणे अंमलबजावणी करण्यासाठी अजय चौधरी सतत प्रयत्नशील असतात. महिलांसाठी आयोजित केलेल्या महालक्ष्मी सजावट स्पर्धेतील विजेत्यांचे त्यांनी कौतुक केले. आभार प्रदर्शन नेमीनाथ जैन यांनी केले. कार्यक्रमास प्रदीप चौधरी, राजू भैरट ,अभिजीत चौधरी ,करून नागरे ,गणेश चौधरी ,राहुल कनकुटे यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.