सोलापूर विद्यापीठात राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगामार्फत कार्यक्रम

सोलापूर - भारतीय स्वातंत्र्य चळवळीत इंग्रजांविरोधात अनुसूचित जमातीमधील अनेक शूर-वीरांनी मोठे योगदान दिले आहे. त्या शूर-वीरांचा इतिहास मागे पडला आहे. वास्तविक अनुसूचित जमातीमधील शुरांचा इतिहास समोर आणून त्यांचा पाठ्यक्रमात समावेश करणे आवश्यक असल्याचे मत मराठी साहित्य मंडळ महाराष्ट्र प्रांताचे अध्यक्ष सिद्धेश्वर कोळी यांनी केले.

मंगळवारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग, नवी दिल्ली आणि अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रम यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य चळवळीत 'अनुसूचित जमातीमधील महापुरुषांचा योगदान' या विषयावर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्ष कोळी बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस या होत्या. याप्रसंगी राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग, नवी दिल्लीच्या सहाय्यक संचालिका दीपिका खन्ना, सामाजिक कार्यकर्ते शरद चव्हाण कुलसचिव योगिनी घारे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. मान्यवरांचा परिचय संयोजक गौरी आमडेकर यांनी करून दिला.

कोळी म्हणाले की, भारतीय स्वतंत्र चळवळीत इंग्रजांविरोधात लढा देण्यासाठी अनुसूचित जमातीमधील महादेव कोळी, मल्हार कोळी, भिल्ल, आदिवासी, रामोशी, बेडर, पारधी आदी समाजातील अनेक तरुणांनी योगदान देऊन इंग्रजांना सळो की पळो करून सोडले होते, मात्र तो इतिहास दबला गेला आहे. समाजासमोर आणि नव्या पिढीसमोर हा इतिहास आला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. दीपिका खन्ना यांनी राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती व नियमावली यावेळी सादर केली. शरद चव्हाण यांनी संपूर्ण देशभरातील 1757 पासून ते भारतीय स्वातंत्र्यापर्यंतचा अनुसूचित जमातीमधील सुमारे 700 जातींमधील शुरांचा इतिहास सांगितला. इंग्रजांविरोधात लढा देताना अनुसूचित जमातीमध्ये एकनिष्ठ सैनिक निर्माण झाले, त्याचा इतिहास तरुणांना माहिती होणे गरजेचे आहे, ते काम वनवासी कल्याण आश्रममार्फत सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. 

कुलगुरू डॉ. फडणवीस म्हणाल्या की, भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात अनुसूचित जमातीमधील महापुरुषांचे योगदान मोठे आहे. या महापुरुषांची माहिती अथवा त्याचा इतिहास योग्य प्रकारे समाजासमोर आणणे आवश्यक आहे. वनवासी कल्याण आश्रमाचे यासंदर्भात सुरू असलेले कार्य कौतुकास्पद आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार शिक्षण क्षेत्रात फार मोठ्या बदलांना सुरुवात झाली आहे. याकरिता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आणि राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग, नवी दिल्ली यांच्यात सामंजस्य करार करण्याचा विचार सुरू आहे. त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वेगळ्या प्रकारे अभ्यास व संशोधन करता येईल. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्र सुरू करण्यात येत आहे. वेगवेगळ्या प्रकारचे अनेक कौशल्य विकासाचे कोर्सेस विद्यापीठाने सुरू केले आहेत, त्याचा फायदा सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना होत आहे, असे ही कुलगुरू डॉ. फडणवीस म्हणाल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तृप्ती बापट यांनी केले तर आभार विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे यांनी मानले.