बीड, दि. 23  जिल्ह्यात आगामी काळात दि. 26 सप्टेंबर पासून साजऱा होणरा नवरात्र उत्सव दि. 5 ऑक्टोबर 2022 रोजी मौजे सावरगाव घाट ता. पाटोदा येथे संपन्न होणारा दसरा मेळावा तसेच जिल्ह्यात हालचाली व घडामोडीमुळे मोर्चे, निदर्शने, आंदोलने, धरणे, रास्ता रोको या सारखे आंदोलने होण्याची शक्यता असून विविध सण उत्सवांच्या अनुषंगाने बीड जिल्ह्यात सार्वजनिक शांतता आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1)) (3) कलमान्वये जिल्ह्याच्या हद्दीत दि. 23 सप्टेंबर 2022 रोजीचे 00.01 वाजेपासून दि. 06 ऑक्टोबर 2022 रोजीचे 00:00 वाजेपर्यंत मनाई आदेश लागू राहील, असे अप्पर जिल्हादंडाधिकारी, संतोष राऊत यांनी कळविले आहे.

            या कालावधीमध्ये मोर्चा, निदर्शने, आंदोलने व धरणेआंदोलने, यांसारख्या आंदोलनामध्ये पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींचा समावेश असलेल्या कोणत्याही जमावास परवानगी शिवाय एकत्र जमण्यास मनाई करण्यात आली आहे.

            तसेच शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्या व्यतिरिक्त अन्य कोणतीही व्यक्तीस सार्वजनिक ठिकाणी किंवा त्याच्या जवळपास खालील गोष्टी करण्यास मनाई करण्यात आली आहे.

            शस्त्रे, सोटे, काठी, तलवार, बंदुक, जवळ बाळगणार नाहीत, काठया, लाठ्या शारीरिक इजा होण्यास कारणीभूत ठरतील, सहज हाताळता येतील अशा वस्तू जवळ बाळगणार नाहीत, कोणतीही, दाहक पदार्थ किंवा स्फोटके जवळ बाळगणार नाहीत, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे, किंवा फोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधे गोळा करुन ठेवणार नाहीत किंवा बाळगणार नाहीत किंवा तयार करणार नाहीत, आवेशी भाषणे, अंगविक्षेपण, विडंबनात्मक नकला करणार नाही, सभ्यता, नितिमत्ता यास बाधा येईल किंवा ज्यामुळे राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा अराजकता माजेल अशी चित्रे, निशाणी, घोषणा फलक किंवा इतर कोणत्याही वस्तू जवळ बाळगणार नाहीत, जाहीरपणे घोषणा करणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे किंवा कोणतीही कृती जे देशाच्या संविधानातील मुल्यांच्या विरुदध असेल किंवा देशाचा मान व सार्वभौमत्व यांना इजा पोहचवणारी असेल किंवा सार्वजनिक सुरक्षा आणि सामाजिक सलोखा यांना हानी पोहचवणारी असेल आणि जाहीरपणे प्रक्षोभक भाषण व असभ्य वर्तन करणार नाहीत. व्यक्तींच्या किंवा शवांच्या किंवा प्रेते किंवा आकृती किंवा त्याच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणार नाहीत. पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींचा समावेश असलेल्या कोणत्याही जमावास परवानगी शिवाय एकत्र येता येणार नाही किंवा मिरवणूक, मोर्चा काढता येणार नाही.

            हे आदेश जिल्ह्याच्या हद्दीत दि. 23 सप्टेंबर 2022 रोजीचे 00.01 वाजेपासून दि. 06 ऑक्टोंबर 2022 रोजीचे 00:00 वाजेपर्यंत मनाई आदेश लागू राहतील. तसेच विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकीस लागू राहणार नाहीत व अशी कोणतीही मनाई राज्य शासनाच्या मंजूरी शिवाय 15 दिवसांपेक्षा जास्त मुदतीपर्यंत अंमलात राहणार नाही. तसेच या आदेशाचे पालन करुन कोणताही मोर्चा, सभा, मिरवणुक व तत्सम कोणतीही कृती करण्यासाठी त्या क्षेत्रातील सक्षम पोलीस अधिकाऱ्याची पूर्वमान्यता घेणे आवश्यक असेल. असेही अप्पर जिल्हादंडाधिकारी, संतोष राऊत यांनी कळविले आहे.