औरंगाबादेतील ९ ६५ बूथप्रमुखांनी प्रत्येकी किमान २५ नवीन मतदारांची नोंदणी करावी . यापुढे भाजपमध्ये इतर पक्षांतील नेत्यांऐवजी बूथ कार्यकर्त्यांना प्रवेश दिला जाईल . त्यामुळे प्रत्येक बूथ केंद्रप्रमुखाने काँग्रेस , राष्ट्रवादी , उद्धवसेना व इतर पक्षातील २५ बूथ कार्यकर्ते फोडावेत . त्यांच्या भाजप प्रवेशाची छायाचित्रे आपल्याला पाठवावीत , असे आवाहन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले . त्यानंतर पाचच मिनिटांनी शिवसेना माजी जिल्हाप्रमुख , मनपातील माजी गटनेते राधाकृष्ण गायकवाड यांच्यासह सहा पदाधिकाऱ्यांना प्रवेश दिला . त्यामुळे मूळ कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला . त्यावर फुंकर टाकताना बावनकुळे यांनी आगामी लोकसभेत औरंगाबादचा खासदार भाजप - शिंदेसेनेचा असेल , यासाठी कामाला लागण्याचे आवाहन केले . शुक्रवारी रोजी ( संत एकनाथ नाट्यगृहात शक्ती केंद्रप्रमुखांचा मेळावा पार पडला . त्यात असे दिसले की , २०२४ ची लोकसभा स्वतंत्र लढण्याची वेळ आली तर महाराष्ट्रात उद्धवसेना आणि बिहारमध्ये जदयूची उणीव भरून काढण्यासाठी नियोजन केले जात आहे . फक्त नेत्यांएवजी इतर पक्षांची बूथवरील तयार यंत्रणा ताब्यात घेण्याचा प्रयत्न होत आहे .