बीड (प्रतिनिधी) - शहरातील खासबाग-मोमीनपुरा जोडणाऱ्या बिंदुसरा नदीवरील नियोजित पुल निर्माणासाठी लागोपाठ दुसऱ्या वर्षी नदीपात्रात डुबकी लगाव निषेध आंदोलन येत्या दिनांक २६ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी १०:०० ते ११:०० वाजेपर्यंत करण्यात येणार असल्याचे आंदोलनकर्ते एस.एम.युसूफ़ व सय्यद इलयास यांनी जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. याविषयी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे कपडो की, बीड शहरातील खासबाग-मोमीनपुरा भाग जोडणाऱ्या बिंदुसरा नदीवरील नियोजित पुलाच्या निर्माणासाठी होत असलेला विलंब या भागातील रहिवाशांवर आणि अन्य नागरीकांवर मोठ्या प्रमाणात अन्याय करणारा आहे. फक्त हे दोन्ही भागच नाही तर बीड शहरातील पूर्व भागातील नागरिक तसेच पश्चिम भागातील नागरिकांना सुद्धा बिंदुसरा नदी पार करून जायचे असल्यास बार्शी रोड, जुना बाजार रोड किंवा सुभाष रोड मार्गे ये-जा करावी लागते. ज्यामुळे नागरिकांचा जास्तीचा वेळ खर्च होतोच शिवाय दुचाकी तीन चाकी किंवा चार चाकी कुठलेही वाहन असो जास्तीच्या इंधनाचा भार सहन करावा लागतो. किंवा नागरिक जोखीम पत्करत नदीच्या पाण्यातून ये-जा करतात. नदीच्या पूर्व बाजूच्या वसाहतीतील नागरिकांना शाळा, महाविद्यालय, बाजारहाट, दवाखाने, आडत मार्केट इत्यादी ठिकाणी जाण्यासाठी जवळपास दोन ते तीन किलोमीटरचा लांब वळसा घेऊन ये-जा करावी लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन गेल्या वर्षी ११ ऑक्टोबर २०२१ साली बिंदुसरा नदी पात्रात नियोजित पुलाच्या जागी आम्ही डुबकी लगाव आंदोलन केले होते. जेणेकरून या विषयाकडे शासन-प्रशासनाचे लक्ष वेधले जावे आणि शासकीय-प्रशासकीय स्तरावर खासबाग-मोमीनपुरा जोडणाऱ्या नियोजित पुलाचे कार्य प्रत्यक्षात सुरू व्हावे. परंतु या आंदोलनाला एक वर्षाचा कालावधी उलटूनही आतापर्यंत येथे पुल निर्माणासाठी साधा एक खड्डा देखील खांदण्यात आला नाही. यामुळे आता पुन्हा एकदा दिनांक २६ सप्टेंबर २०२२ सोमवार रोजी सकाळी १०:०० ते ११:०० वाजेपर्यंत खासबाग-मोमीनपुरा नियोजित पुलाच्या ठिकाणी बिंदुसरा नदी पात्रात काळ्या पट्ट्या बांधून डुबकी लगाव निषेध आंदोलन (२ रे) करणार आहोत. सध्या बिंदुसरा नदीत चांगल्या प्रमाणात पाणी वाहत आहे. यामुळे आंदोलनासाठी आवश्यक ते नियोजन जिल्हा प्रशासनाकडून अपेक्षित आहे.या आंदोलनात धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रमेशराव गंगाधरे, शेख युनूस चऱ्हाटकर, शेख मुबीन, सय्यद आबेद सर यांच्यासह अन्य सामाजिक कार्यकर्त्यांचा सहभाग असणार आहे असे जिल्हाधिकारी मुख्याधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक आणि तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून कळविण्यात आले आहे.