सोलापूर - भारतातील बँकांचे राष्ट्रीयकरण झाले असून त्याचे मालक शासन आहे. राष्ट्रीयकृत बँकांनी गर्भश्रीमंत लोकांनाच मोठ्या प्रमाणात कर्जपुरवठा करीत असून त्यांच्याकडील थकीत कर्जाची आकडेवारीदेखील मोठी आहे. सामान्यांसाठी बँकांचे धोरण मात्र विकृतीचे आहे. बँकिंग धोरणाबाबत आर्थिक साक्षरता निर्माण व्हावी आणि सर्वसामान्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, असे प्रतिपादन बँक युनियन चळवळीचे अभ्यासक कॉम्रेड देविदास तुळजापूरकर (औरंगाबाद) यांनी केले.
शुक्रवारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉइज युनियन, औरंगाबाद यांच्या सहकार्याने कॉम्रेड प्रभाकर यादव व्याख्यानमालेअंतर्गत कॉ. तुळजापूरकर यांचे विशेष व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी त्यांनी 'बँकांचे लोकशाहीकरण' या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस या होत्या. प्र-कलगुरू डॉ. राजेश गादेवार यांनी प्रास्ताविकात सर्वांचे स्वागत करून कॉम्रेड प्रभाकर यादव व्याख्यानमाले संदर्भात सविस्तर माहिती दिली. व्यासपीठावर कुलसचिव योगिनी घारे आणि बँक ऑफ महाराष्ट्र युनियनचे सरचिटणीस धनंजय कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.
कॉ. तुळजापूरकर यांनी रिझर्व बँकेच्या तसेच शासनाच्या अन्य संकेतस्थळावरील आकडेवारीचा उहापोह करीत म्हणाले की, जनधन योजनेमुळे 50 कोटी नवीन खाती उघडण्यात आली. सर्वसामान्य ग्राहक बँकांशी जोडला गेला. आज देखील देशातील 25 ते 27 टक्के लोकांपर्यंत बँकिंग सेवा पोहोचली नाही. तंत्रज्ञानामुळे फार मोठा बदल बँकिंगच्या क्षेत्रात झाला असून त्याचा लाभ देखील होत आहे. मात्र उद्योगपती व गर्भ श्रीमंत लोकांनाच मोठ्या प्रमाणात कर्ज वाटण्यात आली आहेत. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात बँकांची थकबाकी आहे. वास्तविक सामान्य जनतेला दिलेला कर्जाची टक्केवारी अतिशय कमी आहे. मोठ्या लोकांना कर्ज देण्याची स्पर्धा आहे. एक प्रकारची ही विकृती आहे, या विकृतीकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे, असे कॉम्रेड तुळजापूरकर म्हणाले.
कुलगुरू डॉ. फडणवीस म्हणाल्या की, श्रीमंतांना बँकांचा अधिक फायदा मिळतो. सर्वसामान्य ग्राहक हा राजा असे म्हटले जाते, पण प्रत्यक्षात तसे घडत नाही. ज्यांना कर्ज मिळते ते लवकर कर्ज परत करीत नाहीत. शिक्षण क्षेत्रातील जाणकारांनी याकडे लक्ष द्यावे. त्याकरिता बँकिंगमध्ये आमुलाग्र बदल होण्याची गरज आहे, असे ही डॉ. फडणवीस म्हणाल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रुती देवळे यांनी केले तर आभार सहायक कुलसचिव अनिल जाधव यांनी मानले.