आमदार अशोक पवार यांनी साधला सेवाधाच्या विशेष मुलांशी संवाद

( शिक्रापूर प्रतिनिधी ) पिंपळे जगताप ता. शिरुर येथील सेवाधाम मतिमंद निवासी विद्यालयास शिरुर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी भेट देऊन विशेष विद्यार्थ्यांच्या सोबत गप्पा मारत संवाद साधत माहिती घेतली आहे.

                 पिंपळे जगताप ता. शिरुर येथील जय महाराष्ट्र ग्रामविकास शिक्षण संस्था संचलित सेवाधाम मतिमंद निवासी विद्यालय गेली अनेक वर्षे ग्रामीण भागातील बौद्धिक दिव्यांग मुलांच्या करिता कार्य करीत आहे. आज आमदार अशोक पवार यांनी येथील विशेष विद्यार्थ्यांची भेट घेऊन आस्थेने विचारपूस करत विद्यार्थ्यांना प्रश्न विचारले असता सर्व विद्यार्थ्यांनी देखील त्यांना उत्तरे देऊन आमदारांचे मन जिंकले. यावेळी वसतिगृह अधिक्षिका भाग्यश्री चिलात्रे, मुख्याध्यापक पवन कट्यारमल, वाजेवाडीचे सरपंच मोहन वाजे, माजी सरपंच धर्मराज वाजे, नितीन वाजे, स्वप्नील बेंडभर, अण्णासाहेब मांजरे, शंकर लोहोट यांसह मान्यवर उपस्थित होते. दरम्यान आमदार पवार यांनी शिक्षकांसोबत संवाद साधत शिकविण्याच्या पध्दती व उपक्रम देखील जाणून घेतली, यावेळी वसतिगृह अधिक्षिका भाग्यश्री चिलात्रे यांनी वसतिगृहात दिल्या जाणाऱ्या आहाराबाबत माहिती दिली. मुख्याध्यापक पवन कट्यारमल यांनी येथे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांसह दिव्यांगत्व जनजागृती तसेच पालक मार्गदर्शन इत्यादी बाबत माहिती दिली असता आमदार अशोक पवार यांनी सेवाधाम चे मुख्याध्यापक पवन कट्यारमल यांचे विशेष कौतुक करत सेवाधाम विद्यालयास लागणारी सर्व मदत करण्याची तयारी दर्शविली. तर या वेळेस सेवधामचे कार्य व विशेष मुलांचे गुण पाहून आमदार अशोक पवार देखील भारावून गेले. दरम्यान मुख्याध्यापक पवन कट्यारमल यांनी सर्वांचे आभार मानले.