सोलापूर : जिल्हा परिषदेच्या भिंतीलगत असलेली खाेकी काढण्यासाठी महापालिकेचे पथक बुधवारी (ता. 21) सकाळी पाेहाेचले. खाेक्यांसमाेरील कट्टे उखडले. दुकानदारांची पळापळ झाली. यादरम्यान महापालिका आयुक्तांना मुख्यमंत्र्यांनी फाेन केला आहे. तुम्ही कारवाई करू नका, अन्यथा तुमच्यावर कारवाई हाेईल, असा निराेप राजकीय कार्यकर्त्यांनी दिला त्यामुळे कारवाई थांबली.

जिल्हा परिषद, काँग्रेस भवनासमाेरील खाेकी वाहतुकीला अडथळा ठरत असल्याचे पाेलिसांचे म्हणणे आहे. महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी या भागातील अनधिकृत दुकाने हटविण्याचे आदेश भूमी व मालमत्ता विभाग, अतिक्रमण विराेधी पथकाला दिले हाेते. त्यानुसार पालिकेचे अतिक्रमण हटाव पथक बुधवारी सकाळी काँग्रेस भवनासमाेर दाखल झाले.

साेबत जेसीबी, साहित्य जप्त करण्यासाठी वाहने हाेती. सर्व खाेक्यांमधील साहित्य बाहेर काढा, सर्वच जप्त हाेणार असल्याचे पथकातील लाेक सांगू लागले. खाेकेधारक संघटनेचे अध्यक्ष गाैतम मसलखांब आणि इतर लाेक पथकाकडे पाेहाेचले.

आमची दुकाने बेकायदेशीर नाहीत. आमच्या पुनर्वसनाचा विषय प्रलंबित आहे. एकतर्फी कारवाई करू नका, अशी विनंती केली. आमदार विजयकुमार देशमुख, शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांना फाेन केले. काळजे, बापू ढगे आणि इतर कार्यकर्ते दाखल झाले. मुख्यमंत्री कार्यालयातून मनपा आयुक्तांना फाेन गेला आहे. तुम्ही कारवाई करू असे ढगे यांनी अतिक्रमण पथकाला आणि मनपा उपायुक्त मच्छिंद्र घाेलप यांना सांगितले. यादरम्यान कारवाई थांबली.