अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या नामांकित शाळांत शिक्षण देण्याची योजना आदिवासी विकास विभागातर्फे राबविली जाते. सुधारित धोरणानुसार योजनेत समाविष्ट जिल्ह्यातील चार शाळा कायम ठेवण्यात आल्या असून एका शाळेची मान्यता निकष पूर्ण न केल्याने रद्द करण्यात आली आहे.
योजनेत चालू शैक्षणिक वर्षात शाळांची निवड करण्यासाठी निकषांनुसार गुणांकन करण्यात आले. त्यानुसार अमरावतीच्या अप्पर आदिवासी विकास आयुक्त यांच्या कार्यक्षेत्रातील चार शाळा कायम ठेवण्यात आल्या आहेत. योजनेच्या शासनमान्य यादीनुसार श्री. दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टची अमरावतीच्या श्यामनगरातील लोटस इंग्लिश स्कूल, दर्यापूर शिक्षण संस्थेची दर्यापूर इंग्लिश प्रायमरी अँड हायस्कूल, डॉ. के.एम. पवार शैक्षणिक प्रतिष्ठानची डॉ. मुकुंदराव के पवार पब्लिक स्कूल तसेच अवतार मेहरबाबा बहूउद्देशीय संस्थेची अंजनगाव सुर्जी येथील ज्ञानपीठ इंग्रजी माध्यमिक शाळा या चार शाळा यादीत कायम आहेत.
भौतिक सोयी सुविधांचा अभाव, कमी गुणांकन, विद्यार्थी व पालकांच्या तक्रारी आदींमुळे पुरोगामी बेरोजगार नारी बहुउद्देशीय संस्थेच्या नवसारी येथे महर्षी पब्लिक स्कूलची मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या शाळेतील विद्यार्थ्यांचे एकलव्य इंग्रजी माध्यमाच्या शाळा, शासकीय इंग्रजी माध्यमाच्या शाळा किंवा जुन्या दर्जेदार नामांकित निवासी शाळांमध्ये समायोजन करण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत. तसा अहवाल अपर आयुक्तांनी सात दिवसात सादर करण्याचे शासनाचे आदेश आहेत.