मुंबई : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अंतर्गत चालक म्हणून महिलांना संधी देण्याचा निर्णय काही वर्षांपूर्वी घेण्यात आला होता. याकरिता वर्ष २०१९ मध्ये महिलांच्या हाती एस. टी बसचे स्टेअरिंग द्यायचे म्हणून सरळसेवा भरती देखील घेण्यात आली. या भरती मध्ये काही महिला पात्रदेखील ठरल्या होत्या अशा महिलांना ३०० दिवसांचे एस. टी बस चालकाचे प्रशिक्षण पूर्ण करायचे होते त्याकरिता महिलांनी प्रशिक्षणाला सुरुवात देखील केली होती. तत्कालीन राज्य परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी या महिलांना लवकरात लवकर नियुक्ती देण्याचे आश्वासन दिले होते, परंतु मध्यंतरी निर्माण झालेल्या कोरोना महामारीमुळे या सर्व महिलांचे प्रशिक्षण व नियुक्ती प्रक्रिया रखडली होती.
कोरोना काळामुळे या सर्व महिला आर्थिक संकटात सापडल्याने त्यांना नियुक्तीची वाट होती, सध्या बहुतांश प्रशिक्षणार्थी महिलांनी त्यांचे प्रशिक्षण पूर्ण केले असून राज्य सरकार नियुक्तीबाबतीत काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. कुटुंबावर असलेला आर्थिक भार, खासगी नोकऱ्या गेल्याची स्थिती व प्रलंबित चालक भरती यामुळे सर्व महिलांमधून कमालीचा नाराजीचा सूर होता. महामंडळाच्या चालक प्रशिक्षण पूर्ण केलेल्या तब्बल ८० महिलांनी थेट मुख्यमंत्री बंगला गाठत नियुक्तीची मागणी करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली व याप्रकरणी तोडगा काढण्याची विनंती केली आहे.
राज्यपाल भगत सिंग कोश्यारींनी उधळली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर स्तुतीसुमने
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व महिलांची भेट घेतली व त्यांच्या शिष्टमंडळाला पुढच्या दोन दिवसात नियुक्ती संबंधात तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. या सर्व महिलांकडे चालक व वाहक म्हणून परवाने आहे त्यामुळे कुठल्याही पदावर ताबतोड नियुक्ती मिळावी, विभागीय स्तरावर वाहतूक निरीक्षक वाहनांवर नियुक्ती द्यावी, प्रलंबित नियुक्ती असलेल्या १३७ उमेदवारांना न्याय द्यावा अशी विनंती या सर्व महिलांनी मुख्यमंत्र्यांना भेटीदरम्यान केली. एस. टी महामंडळाने नुकतीच घोषणा करत सांगितले की मुख्यमंत्री कार्यालयातून महिलांच्या प्रलंबित भरतीबाबत सूचना प्राप्त झाल्या असून याबाबत येत्या दोन दिवसांत नियोजनाचे आदेश देखील प्राप्त झाले आहे. त्यामुळे लवकरच हे प्रकरण मार्गी लागण्याची चिन्हे आहेत.