मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे सध्या मराठवाडा विभागाच्या दौर्यावर आहेत. यावेळी त्यांनी अहमदनगर आणि औरंगाबाद येथे शहर व ग्रामीण संघटनेचा आढावा घेतला.यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका केली. सोबतच शिंदे-फडणवीस सरकार कधीही बरखास्त होईल, असा दावाही त्यांनी केला आहे. भाजपच्या गणिताची योग्य जुळवाजुळव जमली की सरकार बरखास्त होईल. त्यावेळी एकनाथ शिंदे यांना कळेल की आपण किती मोठी चूक केली आहे.
हे सरकार टिकणार नाही, म्हणूनच प्रशासनसुद्धा सरकारचं ऐकत नाही. या सरकारची प्रशासनावरची पकड मजबूत नाही, असं भाकीत जयंत पाटील यांनी केलं आहे.पुढे पाटील म्हणाले, की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे फक्त 40 मतदार संघपुरत्या विविध घोषणा करीत आहेत.
उरलेल्या मतदारसंघाचे काय? कोणत्याही घोषणेचे GR नाहीत तसंच आदेशही नाहीत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लिखित भाषण वाचतात, असा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे. महाविकास आघाडीबद्दल बोलताना ते म्हणाले, की याबाबत स्थानिक नेत्यांना काँग्रेस आणि शिवसेना नेत्यांशी चर्चा करण्याचे आदेश दिले आहेत.
तिन्ही पक्ष कुठं एकत्रित लढतील याबद्दल स्थानिक नेतृत्वाला अधिकार दिले असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.जयंत पाटलांच्या दाव्यावर आशिष शेलारांची प्रतिक्रिया - काही लोक रात्रीचं स्वप्न पाहतात हे माहिती होतं. मात्र काही लोक दिवसाही स्वप्न पाहतात. ते काम करतात की दिवसा स्वप्नच पाहत राहतात, असा टोला शेलार यांनी जयंत पाटलांना लगावला आहे.