रांजणगाव गणपती: शिरुर तालुक्यातील संग्राम नाथाभाऊ शेवाळे हा युवक कायद्यातील उच्च पदवी प्राप्त करण्यासाठी कारेगावातून थेट लंडनला गेला असून तेथील 'क्वीन्स मेरी' या प्रतिथयश विद्यापीठात त्याची या उच्च शिक्षणासाठी प्राधान्यक्रमातून निवड झाली आहे. पुण्यातील 'भारती विद्यापीठ' येथुन बीएएलएलबी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेला संग्राम लंडन येथे एलएलएम पदवी मिळवून बॅरिस्टर होण्याच्या ध्येयाने, सातासमुद्रापार ही गरूडझेप घेत आहे.
कारेगाव (ता. शिरूर) च्या सामान्य शेतकरी कुटूंबातील संग्राम शेवाळे याचे प्राथमिक शिक्षण गावातीलच जिल्हा परिषद शाळेत तर माध्यमिक शिक्षण शिरूरच्या विद्याधाम प्रशालेत झाले. शास्त्र शाखेतून बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर, त्याने भारती विद्यापीठातून प्रथम श्रेणीत एलएलबीची पदवी मिळवली. विधी विभागातील पुढील उच्च शिक्षणासाठी संशोधन घेत असताना त्याने अनेक ठिकाणी ॲप्लिकेशन केले होते. त्यातून, लंडन येथील गुणवत्तेच्या जागतिक क्रमवारीत तिसऱ्या असलेल्या 'क्वीन्स मेरी युनिव्हर्सिटी' मधे त्याची निवड झाली. तो कायद्यातील उच्च शिक्षणासाठी लंडनला रवाना झाला आहे. दोन वर्षांच्या या प्रशिक्षणादरम्यान 'एलएलएम' ही पदवी प्राप्त करण्याचे त्याचे ध्येय असून तेथे ही पदवी मिळविणाऱ्यास बॅरिस्टरचा किताब दिला जातो.
विधी विभागातील उच्च शिक्षणासाठी लंडन च्या क्वीन्स मेरी विद्यापीठात निवड झालेला कारेगावचा संग्राम हा ग्रामीण भागातील बहुधा पहिला विद्यार्थी असावा. शालेय जीवनापासूनच शैक्षणिक गुणवत्तेत नावलौकीक मिळविणाऱ्या संग्राम ने चौथीच्या शिष्यवृत्तीत राज्यात तिसरा क्रमांक पटकावला होता. तर राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेतही आपला ठसा उमटविला होता. जनता दलाचे (धर्मिनिरपेक्ष) प्रदेशाध्यक्ष नाथा शेवाळे हे त्याचे वडील असून, तो देखील जनता दलाच्या विद्यार्थी आघाडीचा प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. या पदाच्या माध्यमातून त्याने कोरोना काळात विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ व्हावे, म्हणून यशस्वी आंदोलन केले. कोरोनामुळे छत्र हरपलेल्या विद्यार्थ्यांना जेवणाचे डबे पुरविले.
विधी विभागातील उच्च शिक्षणासाठी, लंडन येथे जाणार असल्याच्या पार्श्वभूमीवर संग्राम शेवाळे यांनी माजी पंतप्रधान एच डी.देवेगौडा, दिवंगत माजी पंतप्रधान व्ही पी सिंग यांच्या पत्नी सीतादेवी, जनता दलाचे नेते शरद पाटील, माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.
यावेळी 'शिरुर तालुका डॉट कॉम' शी बोलताना महाराष्ट्र प्रदेश जनता दल (धर्मनिरपेक्ष) विद्यार्थी आघाडी अध्यक्ष संग्राम शेवाळे म्हणाले, लंडन येथील विधी च्या शिक्षणातून एलएलएम ही पदवी पहिल्या श्रेणीत मिळविण्याची महत्वाकांक्षा बाळगली असून, तेथील दोन वर्षांच्या वास्तव्यात सांस्कृतिक देवाण - घेवाणीबरोबरच कायदेविषयक तज्ज्ञांशी सातत्याने सल्लामसलत करणार आहे. आपल्याकडे न्याय व्यवस्थेवरील ताण मोठा आहे. तो ताण या पदवीच्या माध्यमातून हलका करण्यास हातभार लावताना गोरगरीब, वंचित, कामगार, कष्टकरी व प्रामुख्याने तळागाळातील घटकांसाठी व आर्थिकदृष्ट्या दूर्बल व्यक्तींना सुलभ न्याय मिळवून देण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणार आहे.