कन्नड: तालुक्यातील तेलवाडी गावातील एका गोठ्यात लांडग्याच्या हल्ल्यात सहा शेळ्या ठार झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली . ही बाब रविवारी ( ता . १८ ) सकाळी उघडकीस आली . कृष्णा पवार यांच्या मालकीच्या शेळ्या ठार झाल्या असून भरपाई देण्याची मागणी वन विभागाकडे करण्यात आली आहे . प्रादेशिक वन विभागाचे रेस्क्यू टीमचे सदस्य वनरक्षक एम . ए . शेख यांनी सांगितले की , माजी सरपंच उत्तमराव राठोड , दशरथ राठोड यांनी प्रादेशिक वन विभागाच्या अधिकाऱ्यांना ( ता . १८ ) सकाळी याबाबत माहिती दिली . माहिती मिळताच वनरक्षक एम . ए . शेख , जामडी घाटचे वनपाल आर . डी . पठाण , वनरक्षक साबळे , पशुवैद्यकीय विभागाचे डॉ . जावेद शेख यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला . कृष्णा पवार यांचे गावातच घराशेजारीच गोठा आहे . या गोठ्यात शनिवारी रात्री २५ शेळ्या बांधलेल्या होत्या . सकाळी सहा वाजता ते गोठ्याकडे गेले असता २५ पैकी तीन शेळ्या व तीन बोकड लांडग्याच्या हल्ल्यात ठार झाल्याचे दिसून आले . पंचनामा केला घटनास्थळाचा असता एकापेक्षा अधिक लांडग्यांच्या पावलांचे ठसे दिसून आले . या घटनेत शेतकऱ्याचे चाळीस ते पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले आहे . नुकसान झालेल्या शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी प्रा . लखन चव्हाण , डॉ . सीताराम जाधव , विकास पवार , कृष्णा पवार , विजय चव्हाण , नितीन पवार आदींनी वनविभागाकडे केली आहे