पंजाब: मोहाली येथील चंदीगड विद्यापीठातील ६० विद्यार्थिनींचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मोठा गदारोळ माजला होता. दरम्यान चंदीगड विद्यापीठानं याप्रकरणी मोठा खुलासा केला आहे. चंदीगड विद्यापीठात विद्यार्थिनींचे आक्षेपार्ह व्हिडिओ शूट केल्याच्या सर्व अफवा पूर्णपणे खोट्या आणि निराधार असुन एका मुलीनं शूट केलेला वैयक्तिक व्हिडिओ वगळता कोणत्याही विद्यार्थिनीचे कोणतेही व्हिडिओ आढळले नाहीत. तसेच जे आक्षेपार्ह व्हिडिओ आहेत जे तिनं तिच्या प्रियकरासह शेअर केले होते. असं चंदीगड विद्यापीठानं म्हटलंय. तसेच 8 मुलींनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची केवळ ही अफवा असून एकाही मुलीनं असं पाऊल उचलण्याचा प्रयत्न केलेला नाही. या घटनेत एकाही मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं नाही, असंही विद्यापीठानं स्पष्ट केलंय.

याप्रकरणी पंजाब पोलिसांनी संशयित आरोपी विद्यार्थिनीच्या पाठोपाठ तिच्या प्रियकरालाही अटक केली असुन विद्यार्थिनीने हा व्हिडिओ चित्रीत करुन आपल्‍या प्रियकराला पाठवल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. पंजाब पोलिसांनी संशयित आरोपी विद्यार्थिनीला अटक केली होती. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शनिवारी रात्री चंदीगड विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी मोहालीत निदर्शने केली होती.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थिनींनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा दावाही आंदोलकांनी केला आहे. मात्र, पोलिसांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा दावा फेटाळून लावला आहे. मोहालीचे एसएसपी विवेक सोनी म्हणाले की, एका विद्यार्थिनीने हा व्हिडिओ शूट करून व्हायरल केल्याचे प्रकरण आहे. या प्रकरणी गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. संशयित आरोपी विद्यार्थिनीला अटक करण्यात आली आहे.या प्रकरणी फॉरेन्सिक पुरावे गोळा केले जात आहेत. आतापर्यंत आमच्या तपासात एकच व्हिडिओ असल्याचे समोर आले आहे. इतर कोणाचाही व्हिडिओ रेकॉर्ड केलेला नाही. इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि मोबाइल फोन ताब्यात घेतला असून फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले जाणार आहेत., असेही साेनी यांनी सांगितले.

दरम्यान, पंजाबचे उच्च शिक्षण मंत्री गुरमीत सिंग मीत हरे यांनी आज (दि.१८) या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. तर पंजाब राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा मनीषा गुलाटी यांनी माध्यमांना सांगितले की, “ही बाब गंभीर असून, तपास सुरू आहे. मी सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांना आश्वासन देते की, आरोपींना शिक्षा केली जाईल.” पंजाबच्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा मनीषा गुलाटी चंदीगड विद्यापीठात पोहोचणार असून त्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणार आहेत. तर, दुसरीकडं एक विशेष तपास पथकही शिमल्यात पाठवण्यात आलं आहे. विद्यार्थिनींनी संयम बाळगावा, असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.