जालना .कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या विद्यार्थ्यांना पाचवीपासून शेतीचे धडे देण्यात येतील या घोषणेवर सर्व बाजूंनी टीका केली जात आहे. यावर उत्तर देताना सत्तार म्हणाले, आपण हे वाक्य सकारात्मक दृष्टीने म्हणालो होतो. नोकरी नाही लागलीच तर विद्यार्थी चांगला शेतकरी व्हावा या हेतूने मी बोललो होतो. मात्र यामुळे काहींना पोटशूळ उठला. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त जालन्यात कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण करण्यात आलं. यानंतर ते बोलत होते. दरम्यान जिल्ह्यात झालेल्या हुतात्मा स्मारकाची दुरुस्ती करण्यात येऊन सुशोभीकरण केलं जाईल, असं आश्वासन सत्तार यांनी दिलं. राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे केले जातील असंही देखील त्यांनी सांगितलं.राज्यातील 27 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची रक्कम जमा झाली आहे. एनडीआरएफकडून जी मदत मिळते, त्यात बदल करण्याचा अधिकार हा केंद्राचा आहे. त्यामुळे हे बदल करण्यासाठी केंद्राला प्रस्ताव पाठवू, अशी माहिती त्यांनी दिली. मागच्या सरकारमध्ये तिजोरीत खडखडाट होता की नाही हे अजित पवारांनाच माहीत असेल. दरम्यान तिजोरीत खडखडाट असता तर शेतकऱ्यांना मदत केली असती का? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.