मुंबई  : शालेय विद्यार्थ्यांना दिला जाणार गृहपाठ आता बंद हेण्याची शक्यता आहे. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार यासंदर्भात मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी यासंदर्भात माहिती दिली. शालेय शिक्षणमंत्री केसरकर यांनी याविषयी बोलताना सांगितले की, विद्यार्थ्यांच्या गृहपाठाविषयी लवकरच तज्ञांशी चर्चा करुन याबद्दल अंतिम निर्णय घेणार असल्याचं ते म्हणाले. पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचा गृहपाठ घेणं हे पालकांसाठी जिकरीचं असतं. त्यामुळे गृहपाठ बंद झाल्यास पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा ताण हलका होऊ शकतो. त्यामुळे येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा विचार आम्ही करत असल्याचं केसरकर म्हणाले. मात्र गृहपाठाविषयी आम्ही शिक्षक संघटना, संस्था चालकांशी बोलून यावर काय निर्णय घ्यायचा ते ठरवणार आहोत, असं शिक्षणमंत्री दीपक केसरकर म्हणाले. दरम्यान, गृहपाठ नसेल तर विद्यार्थी घरी अभ्यास करतील का? असा प्रश्न पालकांना सतावत आहे. त्यामुळे या निर्णयावर तज्ञ काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्वाच ठरणार आहे.