बालाजी नाईकवाडेहणेगाव (नांदेड): डोक्यावर विस्तीर्ण आकाशाचे छत आणि उसाच्या फडाजवळच मिळालेली मोकळी जागा अशा खरतर परिस्थितीतून अभ्यास करून ऊसतोड कामगारांच्या मुलाने नीट परीक्षेमध्ये ५२० गुण मिळविले आहेत. देगलूर तालुक्यातील दामला नाईक तांडा येथील प्रकाश राठोड या विद्यार्थ्याने हे यश मिळविले आहे. प्रकाश राठोड याच्या रूपाने दुर्लक्षित तांड्याला आता पहिला डॉक्टर मिळणार आहे.
तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्र अशा तीन राज्याच्या सीमेवरील दामलानाईक तांडा. साखर कारखान्याच्या गळीत हंगामात गावोगाव भटकंती करून उदरनिर्वाह करणाऱ्या श्रमिक कुटुंबात प्रकाश राठोड याचा जन्म झाला. लहानपणापासूनच हलाखीची परिस्थिती, आई-वडिलांनी उदरनिर्वाहासाठी हातात घेतलेला कोयता. अशा परिस्थितीत प्रकाशने वस्ती शाळेत चौथीपर्यंतचे शिक्षण घेतले.
जनापूर येथील चंगळामाता आश्रम शाळेत सातवीपर्यंत आणि कै. इंदिराबाई देशमुख कनिष्ठ महाविद्यालयात उच्च शिक्षण घेतले. शिक्षणाची गोडी लागल्याने प्रकाशने जिद्दीने अभ्यास केला. बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगले. त्यादृष्टीने तयारी सुरू केली. कोणत्याही भौतिक सुविधा नसताना, मार्गदर्शकांचा अभाव असतानाही प्रकाशने नीट परीक्षेची तयारी सुरू केली. पहिल्या तीन प्रयत्नांत अपयश पदरी पडले. मात्र खचून न जाता जिद्दीने तयारी केली. अखेर चौथ्या प्रयत्नांत त्याने यशाला गवसणी घातली.