शासकीय कामात अडथळा: आरोपींची निर्दोष मुक्तता 

वैजापूर :- शैलेंद्र खैरमोडे 

पोलिस बिट अंमलदाराला आरडाओरड व शिवीगाळ करून दहशत पाडून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा आरोपातून आरोपींची निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश सहा. अतिरीक्त सत्र न्यायाधीश पी . पी. मुळे यांनी दिले.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, दि. २१ डिसेंबर २०१५ रोजी रात्री ९:५० चे सुमारास शिऊर येथील रहिवाशी ओंकार मोतीराम अन्नदाते व प्रकाश ओंकार अन्नदाते हे संगनमत करून ओंकार याचे पत्नीस मारहाण करीत होते. त्यावेळी त्यांचे घरासमोर राहणारे पोलिस पाटील सुनील माधवराव देशमुख यांनी स्थानिक बिट अंमलदार व या घटनेचे फिर्यादी शेख रज्जाक शेख हुसैन यांना फोनवरून घटनेची माहिती दिली. मिळालेल्या माहितीवरून फिर्यादी हा सदर घटनास्थळावर आरोपींना समजावून सांगण्यास गेला असता, यातील आरोपितांनी संगनमत करून आमचे घरगुती भांडणात ढवळाढवळ करण्याची गरज काय आहे? आमच्या भांडणात पडला तर तुमची नौकरी ठेवणार नाही असे म्हणून आरडाओरड आणि शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा केला म्हणून भा.दं.वी. कलम ३५३ व इतर सह कलमांतर्गत पोलिस ठाणे शिऊर येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

प्रकरणात तपास अधिकारी पी. आर. जाधव यांनी तपास करून दोघा आरोपींविरोधात न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. यात सरकार पक्षातर्फे चार साक्षीदार तपासण्यात आले. प्रकरणात आरोपींचे वकील एस. एस. ठोळे यांनी केलेला उलटतपास व मुद्देसूद युक्तीवाद लक्षात घेऊन सबळ पुराव्याअभावी आरोपींची निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश सहा. अतिरीक्त सत्र न्यायाधीश पी. पी. मुळे यांनी दिले. आरोपींच्या वतीने ॲड. एस. एस. ठोळे व ॲड. आकाश ठोळे यांनी काम पाहिले.