परभणी(प्रतिनिधी)एआयटीयुसी प्रणित मराठवाडा हमाल माथाडी मजदूर युनियन (लालबावटा)च्या वतीने आज गुरुवारी (दि.15) जिल्हा कचेरीसमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले. विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनास सादर करण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, Aदि 14 फेब्रुवारी 2022 पासून आजतागायत परभणी जिल्ह्यात एकही गुड्स ट्रेन एफसीआय (फूड कार्पोरेशन ऑफ इंडिया) द्वारा पाठविण्यात आलेला नाही. सुमारे 7 महिन्यांपासून परभणी येथे एफसीआय व वखार महामंडळ गोदामे येथे कोणतीही धान्य साठवणूक करण्यात आलेली नाही. परिणामी या धान्याच्या उलाढालीवर अवलंबून असलेले 250 हमाल माथाडी कामगार आणि अन्य घटक सुमारे 1000 पेक्षा जास्त लोक 7 महिन्यापासून बेरोजगारी आणि उपासमारीच्या संकटात सापडले आहेत.

संकट काळासाठी बफर धान्यसाठा करून ठेवण्याची कायदेशीर जबाबदारी एफसीआय प्रशासनाची आहे. मात्र कंत्राट निश्चितीच्या गोंधळामध्ये एफसीआय (फूड कार्पोरेशन ऑफ इंडिया) च्या बेजबाबदार धोरणामुळे संपूर्ण धान्य पुरवठा विस्कळीत करण्यात आलेला आहे. आज एफसीआय व वखार महामंडळ गोदामे येथे एक पोते सुद्धा धान्य उपलब्ध नाही. परभणी जिल्ह्यातील लाखो रेशन कार्ड धारकांना महिनोंमहिने धान्य मिळत नाही. सणासुदीला देखील आवश्यक वस्तूंच्या टंचाईस तोंड द्यावे लागते आहे. जर एखादी संकट अवस्था निर्माण झाल्यास मोठे अन्न संकट परभणी जिल्ह्यात निर्माण होवू शकते. यामुळे आपल्या विविध मागण्यांची तातडीने दखल घेण्यात यावी यासाठी परभणी जिल्हाधिकारी कचेरी समोर आज गुरुवार (दि.15) सप्टेंबरपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरु करण्यात आले आहे. परभणी जिल्ह्यात एफसीआय व वखार महामंडळ गोदामात धान्य वाहतूक सुरु करा. परभणी रेल्वे गुड्सशेड येथे ऋउख गुड्स ट्रेन पूर्ववत सुरु करा. कामगारांना एफसीआयद्वारे 14 फेब्रुवारी 2022 पासून बेरोजगार भत्ता व रिटेन्शन भत्ता तत्काळ अदा करा या मागण्या करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी दखल न घेतल्यास युनियनला उग्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा देण्यात आला आहे. धरणे आंदोलनात लाल बावटाचे सरचिटणीस कॉम्रेड राजन क्षीरसागर, रेल्वे गुड शेडस युनियनचे बाबू खान पठाण, वखार महामंडळ कामगार युनियनचे सय्यद अजगर यांच्यासह हमाल-माथाडी कामगार सहभागी झाले आहेत.