श्रावणी सोमवार निमित्ताने भाविकांची वाघोलीतील वाघेश्वर मंदिरात होणारी गर्दी लक्षात घेता वाघोली विकास प्रतिष्ठाणच्या वतीने भाविकांना सुलभ दर्शन घेता यावे यासाठी योग्य व्यवस्था करण्यात आली आहे. मंदिर परिसरराचे सुशोभीकरण करून जय्यत तयारी करण्यात येत आहे.  

कोरोनाच्या दोन वर्षांनंतर यंदा पहिल्यांदाच वाघेश्वर मंदिरात श्रावण महिन्यात दर्शनासाठी भाविकांची होणारी गर्दी पाहता योग्य व्यवस्था करण्यात आली आहे. वाघोली येथील वाघेश्वर मंदिर हे जागृत देवस्थान असून पुणे जिल्ह्यातील हजारो भाविक दर्शन घेण्यासाठी गर्दी करत असतात. त्या पार्श्वभूमीवर वाघेश्वर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष राजेंद्र सातव पाटील तसेच उपाध्यक्ष रामदास दाभाडे यांनी सांगितले की ट्रस्ट, महापालिका कर्मचारी, लोणीकंद पोलिसांच्या वतीने जय्यत तयारी केली आहे . 

वाघोली येथील वाघेश्वर मंदिर हे पुणे नगर महामार्ग लगत असल्याने मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत असते. यामुळे वाहतूक कोंडी होत असते ही वाहतूक कोंडी होऊ नये व भाविकांनाही त्रास होऊ नये यासाठी लोणीकंद पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त नेमण्यात आला असल्याची माहिती लोणीकंदचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांनी दिली. 

  वाघेश्वर मंदिर येथे महाशिवरात्र, श्रावण महिना, श्रावणी सोमवार, त्रिपुरीपौर्णिमा यावेळी मनोभावे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी होत असते. हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्यात शिवशंकराच्या पवित्र शिवलिंगाचे दर्शन पवित्र मानले जात. यावर्षी १, ८, १५, २२ ऑगस्टला असे चार श्रावणी सोमवार आले आहेत.