राख सावडायला आलेल्या एका शेतकऱ्याला अज्ञात भामट्याने गंडवले ; तेवीस हजाराची रोकड गायब ; पाचोडच्या आठवडी बाजारातील घटना......!

पाचोड प्रतिनिधी;-पाचोड येथे राख सावडायला आलेल्या हर्षी ता.पैठण येथील ५५ वर्षीय शेतकऱ्याला साई मंदिराचा पत्ता विचारण्याच्या बहाण्याने एका अज्ञात भामट्याने मला देणगी द्यायची आहे. तुम्हीही द्या थोडी फार, असे म्हणत शेतकऱ्याला खिशातील पैसे काढायला लावले व रुमालात ठेवल्याचा बनाव करत हातचालाखीने २३ हजार रुपये घेवून पसार झाल्याची घटना रविवार दि.३१ रोजी पाचोड येथील आठवडी बाजारात घडली.

      यासंबंधी अधिक माहिती अशी की, पाचोड जवळील हर्षी ता. पैठण येथील शेतकरी जनार्धन माणिकराव ढगे हे पाचोड येथे राख सावडण्यासाठी आले होते. राख सावडून ते आठवडी बाजारात आले असता, त्यांना दुचाकी वरून आलेल्या एका अनोळखी ईसमाने साई मंदिर कुठे आहे, मला मंदिराला देणगी द्यायची असे म्हणत तुम्हीही थोडी फार देणगी द्या, त्यावेळेस शेतकरी म्हणाला की माझ्याकडे पैसे नाही, तेव्हा तो म्हणाला तुमच्या खिशात चाळीस हजार रुपये आहेत द्या दहा पाच हजार, अशी भुरळ घातली मात्र शेतकऱ्याच्या खिशात तेवीस हजारच होते, तेव्हा त्यांनी खात्री म्हणून टावझर च्या खिशातून पैसे बाहेर काढले व त्या दोघांनी ते मोजले मात्र ते तेवीस हजारच भरले, मात्र शेतकऱ्याने देणगी द्यायला नकार दिल्याने बरं नका देवू मात्र ते पैसे खिशात न ठेवता रुमालात ठेवा असे सांगितले, भुरळ पडलेल्या शेतकऱ्याने त्यांचा गळ्यातील मोठा रुमाल काढला अन् त्या भामट्याने ते पैसे रुमालात ठेवल्याचा बनाव करत हातचलाखीने पैसे काढून घेतले व दुचाकीवरून पसार झाला. त्या भामट्याने रुमालाची अशी काही घडी बसवली की त्या शेतकऱ्याला वाटावं की पैसे रुमालात गुंडाळून ठेवलेले आहे. काही वेळ पुढे चालत गेल्यावर शेतकऱ्याने रुमलाची घडी विस्कटून आपले पैसे सुरक्षित आहे का ते पाहिले असता, त्यात दमडीही मिळून आली नाही. तेव्हा शेतकरी भांबावून गेला, व डोक्याला हात लावून खाली बसला, अरडा ओरड करून बाजारातील लोकांना याबाबत सांगितले मात्र तो पर्यंत तो भामटा पसार झाला होता. पोलिसांना माहिती मिळाल्यावर पोलीस उपनरीक्षक सुरेश माळी यांनी घटनास्थळी दाखल होत शेतकऱ्याची विचारपूस केली, काळा शर्ट पांढरी पँट दाढी असलेला जाड जुड ईसम लाल रंगाची दुचाकीवरून आला असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले.