प्रथम महिला कुलसचिवपदाचा मान; सेवेत रुजू

सोलापूर - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलसचिवपदी मुंबई विद्यापीठातील वरिष्ठ उपकुलसचिव श्रीमती योगिनी घारे यांची निवड झाली आहे. गुरुवारी त्या आपल्या पदाचा पदभार स्वीकारून सेवेत रुजू झाल्या आहेत. विद्यापीठाच्या कुलसचिवपदावर विराजमान होणाऱ्या त्या पहिल्याच महिला अधिकारी ठरल्या आहेत.

कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने निवड प्रक्रियेद्वारे त्यांची निवड केली आहे. गुरुवारी श्रीमती घारे यांनी कुलसचिवपदाचा पदभार स्वीकारला. प्रारंभी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले. विद्यापीठातील शिक्षक, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थ्यांनीदेखील त्यांचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

श्रीमती योगिनी घारे यांचे पदवी शिक्षण मुंबई विद्यापीठातून मानसशास्त्र या विषयातून झाले आहे. पदव्युत्तर शिक्षण एसएनडीटी महिला विद्यापीठातून झाले असून एम.फिल.ची पदवी त्यांनी चेन्नई येथील अण्णामलाई विद्यापीठातून घेतली आहे. 1994 साली त्या मानसशास्त्र विषयाचे शिक्षक म्हणून ठाणे येथील एनकेटी पदवी महाविद्यालयात रुजू झाल्या. डोंबिवली येथील प्रगती महाविद्यालयातदेखील त्यांनी अध्यापनाचे कार्य केले आहे. सन 2002 ते 2011 दरम्यान नवी मुंबई येथील एफ. जी. नाईक महाविद्यालयात शिक्षक व प्रभारी प्राचार्यपदाची जबाबदारी सांभाळली आहे. त्यानंतर नोव्हेंबर 2011 मध्ये मुंबई विद्यापीठात उपकुलसचिव म्हणून त्यांची नियुक्ती झाली. मागील साडेचार वर्षे त्या कुलगुरू कार्यालयात कार्यरत होत्या. त्यापूर्वी त्यांनी सभा व निवडणूक विभाग, शिक्षक पात्रता विभाग, आस्थापना विभाग, विद्यापीठ शिक्षक विभाग, संलग्नता विभाग, तक्रार व निवारण कक्षाची जबाबदारी सांभाळली आहे. 

आता सोलापूर विद्यापीठात कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी यांच्यासाठी विशेष काम करण्याचा मानस असून लोकाभिमुख प्रशासन देण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे नूतन कुलसचिव श्रीमती योगिनी घारे यांनी सांगितले.