औरंगाबाद: औरंगाबाद शहरात व्यापारासाठी आलेल्या एका सराफा व्यापाऱ्याचा चक्क पोलीस कर्मचाऱ्यानेच २१ लाखांचा ऐवज लंपास केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत सविस्तर मही अशी की, सोयगाव पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेला पोलीस कर्मचारी संतोष वाघ आणि त्याचा मित्र रामचंद्र दहिवाळ याने सराफा व्यापारी असलेले अशोक जगन्नाथ विसपुते (रा. सेंट्रल बैंक कॉलनी, पिंप्राळा, जळगाव) यांना दागिने खरेदीच्या बहाण्याने सोमवार दि. १२ औरंगाबाद येथे बोलावले. विसपुते यांची भेट घेऊन दहिवाळने सोन्याच्या दागिन्यांची पाहणी केल्यावर आपला व्यवहार जमणार नसल्याचे सांगून तेथून निघून गेला..

त्यामुळे विसपुते दागिने घेऊन परत निघाले असता संतोष वाघने त्यांना केंब्रिज चौकात अडवले. व मी पोलीस असल्याचे सांगून चौकशीच्या नावाखाली आरोपी वाघ याने विसपुते यांच्याकडील १२ लाखांचे दागिने आणि साडेआठ लाख रुपयांची रोकड हिस्कावाली आणि तेथून निघून गेला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने अशोक विसपुते यांनी सिडको एमआयडीसी पोलिसात धाव घेतली. विसपुते यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी रामचंद्र दहिवाळ आणि संतोष वाघ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.