व्यसनी, गंजेटी व दारुड्यांचा बिमोड करा !

बीड (प्रतिनिधी) शहरातील किल्ला मैदान परिसरातील डाक बंगला इमारतीमध्ये एखादे शासकीय कार्यालय सुरू करून तेथे फोफावलेल्या व्यसनी, गंजेटी व दारुड्यांचा बिमोड करावा अशी मागणी मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक आणि तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

याविषयी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, शासकीय मालकीचे असलेल्या बीड शहरातील किल्ला मैदान परिसरातील डाक बंगला ची इमारत गेल्या कित्येक वर्षांपासून उपयोगाअभावी पडून आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून तिथे बीड नगर परिषदेकडून देखभाल केली जात नसल्याने पुर्वी जिथे गोरगरीब कुटुंबियांची लग्न किंवा इतर समारंभ बीड नगर परिषदेत नाममात्र फी भरून डाक बंगल्यात केली जायची. तिथे आजघडीला लग्न किंवा इतर समारंभासाठी आवश्यक असलेल्या सोयी सुविधा, वीज व पाणी नसल्याने डाक बंगला च्या इमारतीकडे आर्थिक दृष्ट्या अत्यंत गरीब असलेल्यांनी सुद्धा पाठ फिरवल्याने गेल्या कित्येक वर्षांपासून तिथे लग्न किंवा इतर समारंभ होणे बंद झाले आहे. यामुळे ही इमारत अडगडीत पडल्याने आता इथे व्यसनी, गंजेटी, दारूडे मोठ्या प्रमाणात येऊन गांजा, दारू तर तरुण व नवतरुण मुले विडी, सिगारेट फुंकण्यासाठी तसेच बंदी असतानाही चोरून मिळणारा गुटखा खाण्यासाठी, या व्यसनांच्याही पुढे जाऊन काही जण पंक्चर चे सोल्युशन, व्हाइटनर, झंडू बाम, खोकल्याच्या औषधी इत्यादींच्या डब्या व बाटल्या नशेसाठी वापरून व्यसन पूर्ण करीत आहेत. या डाक बंगला च्या बाजूलाच बीड शहरातच नाही तर जिल्ह्यात महाविद्यालयीन शिक्षणात क्रमांक एक वर असल्याचे नावलौकिक मिळविलेले बलभीम महाविद्यालय आहे. जिथे हजारोंच्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. विशेष म्हणजे बलभीम कॉलेजच्या कोपऱ्यालाच एक पोलीस चौकी सुद्धा आहे. परंतु ती फक्त नावालाच. तिला नेहमी २४ तास टाळे असते. पोलीस विभागामध्ये त्या पोलीस चौकी साठी कागदोपत्री पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जात असेल ही. परंतु तिथे एकही पोलीस कर्मचारी कर्तव्य बजावण्यासाठी फिरकत नाही ही वस्तुस्थिती आहे. शिवाय याच किल्ला परिसरामध्ये मिल्लिया नावाची खूप मोठी उर्दू शिक्षण संस्था आहे. जिथे केजी टू पीजी पर्यंतचे शिक्षण विद्यार्थी व विद्यार्थिनींना देण्यात येते. बलभीम व मिल्लिया या दोन्ही महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींना या व्यसनी, ग॔जेटीं व दारुड्यांचा अनेकदा त्रासही होतो. छोट्या-मोठ्या अप्रिय घटनाही घडतात. याची शहरात जाहीर वाच्यताही होते. परंतु नंतर पुन्हा जैसे थे होऊन जाते. मात्र अशा व्यसनी, गंजेटी व दारूड्यांमुळे डाक बंगला इमारतीला अक्षरशः अवकळा आली आहे. इथे दारूच्या रिकाम्या बाटल्या, गांजा पुळ्याच्या रिकाम्या कागदांचा खच, बिडी सिगारेटची थोटके, गुटख्यांच्या रिकाम्या पुड्या, सोल्युशन, व्हाइटनर, झंडू बाम, खोकल्याच्या औषधींचे रिकाम्या बाटल्या इत्यादी मोठ्या प्रमाणात साचलेली आढळून येतात. परंतु याला अंकुश लावण्याचे कार्य ना बीड नगर परिषद प्रशासनाकडून होते, ना पोलीस प्रशासनाकडून. म्हणून निवेदनाद्वारे चारही उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या सेवेत सविनय नम्र विनंती केली आहे की, डाक बंगला या शासकीय इमारती मध्ये शहरात एखाद्या भाड्याच्या जागेत असलेले शासकीय कार्यालय हलवावे. ज्यामुळे शासनाचे खाजगी इमारत मालकाला दरमहा दिले जाणारे भाडे वाचेल आणि डाक बंगला मधील व्यसनी, गंजेटी व दारुड्यांचा बिमोड ही होईल. शिवाय गेल्या अनेक वर्षांपासून डाक बंगला इमारत अडगळीत पडल्याने आतापर्यंत अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी या इमारतीमध्ये विद्यार्थिनींचे वस्तीगृह किंवा जिल्हा रुग्णालयाचा एखादा विभाग सुरू करावा म्हणून अनेक वेळा मागणी केलेली आहे. परंतु शासकीय-प्रशासकीय स्तरावर या मागण्यांची दखल आजपर्यंत ही घेण्यात आलेली नाही. तेव्हा निदान भाड्याच्या जागेत असलेले एखादे शासकीय कार्यालय तरी डाक बंगलाच्या या इमारतीत हलवावे. असे मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून म्हटले आहे.