नाशिक: राज्यातील विविध भागातून दिवसेंदिवस बलात्कार अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसत असुन नाशिक जिल्ह्यातून अशीच एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.येथील एका डॉक्टरने अल्पवयीन परिचारिकेवर शारीरिक अत्याचार केला असुन याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून अंबड पोलीस ठाण्यात पोस्को कायद्यांतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल झाला असुन डॉ. उल्हास कुटे असे या नराधम आरोपीचे नाव आहे. बलात्कार, पोस्को आणि ॲट्रोसिटीचाही गुन्हा दाखल झाल्याने नाशिक शहरात खळबळ उडाली आहे.
नाशिक जिल्ह्यातील अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोरवाडी येथे एका खासगी रुग्णालयात ही संतापजनक घटना घडली असुन पीडित तरुणी या रुग्णालयात प्रशिक्षणार्थी परिचारिका आहे. संशयित आरोपी डॉ. उल्हास कुटे याने माझे हात पाय दुखत असल्याने मी येतोय असे सांगत पीडितेच्या रुममध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर तिच्यावर बळजबरी करत शारीरिक अत्याचार केला. इतकेच नव्हे तर अत्याचार केल्यानंतर संशयित आरोपी कुटे याने 'ही बाब जर कुणाला सांगितली तर तुला कामावरून काढून टाकील' अशी धमकी दिली अशी तक्रार पीडितेने केली आहे.
या धक्कादायक प्रकारानंतर हि पिडीत तरुणी पूर्णपणे गांगरून गेली. तिने नातेवाईकांच्या मदतीने पोलिसांकडे धाव घेत अंबड पोलीस ठाण्यात घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता या प्रकरणाची दखल घेत पीडितेच्या तक्रारीनुसार बलात्कार, पीडित अल्पवयीन आणि अनुसूचित प्रवर्गातील असल्याने पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असुन याप्रकरणी अंबड पोलिसांनी तातडीने कारवाई करत संशयित आरोपी नराधम डॉ. उल्हास कुटे याला अटक केली आहे. अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोहेल शेख, महिला पोलीस उपनिरीक्षक सोनल फडोळ या याप्रकरणाचा तपास करत आहेत.