परभणी जिल्ह्यातील बालविवाहाच्या प्रथेला आळा घातला जावा या उद्देशाने जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळा सर्व व्यवस्थापन व सर्व माध्यमाच्या शाळा - महाविद्यालयातील विद्यार्थी, पालक आणि शिक्षक बालविवाह प्रतिबंधक शपथ घेणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे, माध्यमिकच्या शिक्षणाधिकारी आशा गरुड यांनी दिली आहे. सोमवारी (दि.12) परभणी जिल्ह्यातील सर्व शाळांचे विद्यार्थी पालक आणि शिक्षक एकाच वेळी बालविवाह प्रतिबंधक शपथ घेऊन जिल्ह्यातील बालविवाहाचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. याबाबतचे संबंधितांना निर्देश शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी आंचल गोयल आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली बालविवाह प्रतिबंधक शपथ कार्यक्रमाचे आयोजन जिल्हाभरात एकच वेळी करण्यात आले आहे. जिल्ह्यात बालविवाह होण्याचे जवळपास 48% प्रमाण आहे. बालविवाहाला रोखण्यासाठी जिल्हाधिकारी आंचल गोयल आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे संबंधीत यंत्रणांच्या माध्यमातून मोठे शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. जिल्ह्यातील नागरिकांनी देखील आपल्या मुलीचा बौद्धिक, शैक्षणिक, शारीरिक आणि मानसिक विकास झाल्याशिवाय तसेच तिच्या वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतरच विवाह करण्याचे आवाहन जिल्हा शासनाच्या वतीने वेळोवेळी करण्यात येत आहे. पहिली ते बारावी वी च्या शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मदतीने बालविवाह प्रतिबंधक शपथ घेण्याचा उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्या बाबत मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी संबंधित यंत्रणांना सूचना दिल्या आहेत.