रांजणगाव गणपती:- कारेगाव येथील यश इन चौकातील गोवा वाईन्स येथून देशी-विदेशी दारुचा साठा घेवुन पुणे-नगर रोडने बेकायदेशीर वाहतुक करताना दुचाकी वाहनासह दोन जणांना रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी अटक केली असुन रामदास हरिभाऊ शिंदे (वय 32) सध्या रा. रांजणगाव गणपती, ता. शिरुर, जि. पुणे. मुळ (रा. चिखली, ता. आष्टी, जि. बीड) आणि 2) धनाजी विठ्ठल साळुंके (वय 33) सध्या रा. लांडेवस्ती, रांजणगाव ग, ता. शिरुर, जि. पुणे. (मुळ रा. नेरले. ता. करमाळा, जि. सोलापुर) अशी अटक केलेल्या व्यक्तीची नावे असुन याबाबत पोलीस कॉन्स्टेबल विजय शिंदे यांनी फिर्याद दाखल केली आहे.
याबाबत रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज शनिवार (दि 10 ) रोजी दुपारी 4:30 च्या सुमारास सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल पोलीस हवालदार विलास आंबेकर, पोलीस कॉन्स्टेबल विजय शिंदे हे तिघेजण नगर-पुणे रस्त्यावर खाजगी वाहनातून पेट्रोलिंग करत असताना दत्तात्रय शिंदे यांना गोपनीय बातमी मिळाली की, यश इन चौकातील गोवा वाईन्स येथुन दोनजण देशी-विदेशी दारुचा साठा घेवुन नगर पुणे हायवे रोडने पुणे बाजुकडे थोड्या वेळाने जाणार आहेत. त्यावेळी पोलिसांनी नगर-पुणे हायवे रोडलगतच्या हॉटेल शांताई येथे सापळा लावला. त्यावेळी नगर -पुणे रोडने एक पांढ-या रंगाच्या बुलेटवरती (गाड़ी क्रं MH 14 CL 0036) दोन जण रांजणगावच्या बाजुकडे जातांना दिसले. त्यांच्या दोघांच्या मध्ये एक बॉक्स ठेवलेले होते.
त्यावेळी पोलिसांनी त्यांना इशारा करुन मोटार सायकल थांबविण्यास सांगीतली. परंतु त्यांनी गाडी न थांबविता जोरात पुणे बाजुकडे पळविली. त्यावेळी पोलिसांनी खाजगी गाडीमधुन त्या मोटार सायकलचा पाठलाग करुन काही अंतरावर थांबविले. त्यावेळी या दोघांना ताब्यात घेवुन त्यांच्याकडे असणाऱ्या बॉक्सची पहाणी केली असता त्यामध्ये देशी-विदेशी दारुचा प्रोव्हिशन गुन्हयाचा माल मिळुन आला. त्यामध्ये जप्त केलेल्या दारुच्या बटल्यांची एकुण 11 हजार 400 रुपयांची दारु आणि 1 लाख 50 हजार रुपयांची बुलेट गाडी असा एकुण 1 लाख 61 हजार 400 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे पुढील तपास करत आहेत.