अमरावती महानगरीची सांस्कृतिक ओळख असलेल्या गणेशोत्सवास यंदा ३१ ऑगस्ट पासून सुरुवात झाली आणि अनेक अमरावतीकरांच्या घरी लाडक्या बाप्पाचे आगमन होण्यासोबतच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये देखील गणराय विराजमान झाले. या लाडक्या गणरायाला अनंत चतुर्दशीच्या दिवशी निरोप देत पुढच्या वर्षी लवकर येण्याचे विनंतीही आपण करणार आहोत. या अनुषंगाने गणरायाला निरोप देण्यासाठी अमरावती महानगरपालिका विविध सेवा-सुविधांसह सुसज्ज आहे. महानगरपालिका आयुक्त डॉ.प्रविण आष्‍टीकर यांच्या मार्गदर्शनात अनंत चतुर्दशीच्या अनुषंगाने विविध स्तरिय सेवा-सुविधांबाबत कार्यवाही करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने छत्रीतलाव व प्रथमेश जलाशय नैसर्गिक विसर्जनस्थळी करण्यात आलेली विविध स्तरिय सुव्यवस्था आणि २१ ठिकाणी अमरावती महानगरपालिकेद्वारे उभारण्यात आलेले कृत्रिम विसर्जन स्थळांचा समावेश आहे, अशी माहिती उपायुक्‍त डॉ.सिमा नैताम यांनी दिली आहे.याबाबत अधिक माहिती देतांना महानगरपालिका आयुक्‍त डॉ.प्रविण आष्‍टीकर यांनी सांगितले की, अनंत चतुर्दशी दिनाच्या श्री गणेश मूर्ती विसर्जनासाठीची पूर्वतयारी ही साधारणपणे गणेश चतुर्थीच्या आधी जवळ-जवळ दीड ते दोन महिन्यांपासून करावी लागते. गणेशोत्सवाच्या अनुषंगाने अमरावती महानगरपालिकेद्वारे विविध गणेश मंडळांबरोबर समन्वय साधून अगदी त्यांना मंडपाच्या परवानग्या देण्यापासून ते अनंत चतुर्दशीपर्यंतच्या विसर्जनापर्यंत दिवसरात्र पद्धतीने कार्य केले जाते. अनंत चतुर्दशीदिनी अमरावती महानगरपालिकेचे कामगार, कर्मचारी व अधिकारी अव्याहतपणे कार्यरत असतात. या दिवशी मोठ्या संख्येने अमरावती महानगरपालिकेचे मनुष्यबळ कार्यरत असते.जीवरक्षकांसह इतर व्यवस्था करण्यात आली आहे. गणेश विसर्जनापूर्वी भक्तांनी अर्पण केलेले हार, फुले इत्यादी निर्माल्य जमा करण्यासाठी निर्माल्य कलशांसह निर्माल्य वाहनांचीही व्यवस्था करण्यात आली आहे.