पशुधन वाचविण्यासाठी शासन खंबीर- महसूल मंत्री विखे-पाटील
ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा
ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं
औरंगाबाद,- राज्यात 17 जिल्ह्यात लंपी स्कीन डिसिज आजाराचा प्रादुर्भाव झालेला आहे. राज्यात या आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी जनावरांचे लसीकरण व आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याच्या सूचना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. शेतकऱ्यांचे पशुधन वाचविण्यासाठी शासन खंबीर असल्याचेही ते म्हणाले.
विभागीय आयुक्तालयात लंपी स्कीन डिसिज आजारासंदर्भात उपाययोजना संदर्भातील बैठक मंत्री विखे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीस कृषी मंत्री अब्दुल सत्तार, आमदार हरिभाऊ बागडे, पशु संवर्धन विभागाचे आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे, प्रादेशिक पशु संवर्धन सह आयुक्त संजय गायकवाड, जिल्हा पशु संवर्धन उपायुक्त डॉ. पी.डी.झोड आदींसह विभागीय आयुक्तालयातील, जिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. विभागातील जिल्हाधिकारी, राज्यातील पशु संवर्धन विभागाचे सर्व अधिकारी ऑनलाइन उपस्थित होते.
मंत्री विखे-पाटील म्हणाले, राज्यात लंपी स्कीन डिसिजचा झपाट्याने प्रसार होतो आहे. या आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी अधिकाऱ्यांनी मोठ्याप्रमाणात जनजागृती करावी. जागृतीसाठी सोशल मिडियाचाही वापर करावा. लंपी आजारावर उपयुक्त असणाऱ्या औषधींची उपलब्धता मुबलक प्रमाणात असावी. लंपी आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी खासगी डॉक्टरांची मदत घ्या. राज्यात लसीकरणावर भर देण्यात येत आहे, याबद्दल प्रशासनाचे अभिनंदन. परंतु यामध्ये अधिक गतीने लसीकरण करावे. पशु मृत पावल्यास संबंधित पशुधन मालकास तातडीने जिल्हा परिषदेच्या सेस निधीतून दहा हजारांची मदत द्यावी, अशा सूचनाही त्यांनी मराठवाड्यातील जिल्हाधिकारी यांना केल्या
लंपी स्कीन डिसिज आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून जनावरांच्या वाहतुकीवरही बंदी आहे. त्याचबरोबर प्रशासनाने प्रभावीपणे उपाययोजना करून जनावरांचा मृत्यूदर कमी करावा, असेही विखे- पाटील यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.
पशुधन दगावल्या जाणार नाही याची सर्व यंत्रणांनी दक्षता घ्यावी, अशा सूचना कृषी मंत्री सत्तार यांनी केल्या. जनावरांसाठी आवश्यक तपासणी प्रयोगशाळा जिल्हास्तरावर अद्यावत कराव्यात. यासाठी पशु संवर्धन विभागाने जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव सादर करावा, असेही त्यांनी सांगितले.
आमदार बागडे यांनी जनावरांना योग्य वेळेत उपचार मिळावा, अशी सूचना मांडली. लंपी स्कीन डिसिज आजारावर नियंत्रणासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत मोठ्याप्रमाणात जागृती निर्माण करावी,अशी अपेक्षा व्यक्त केली. महसूल मंत्री विखे पाटील यांनी त्यांची सूचना मान्य करत जनजागृती करण्यावर भर देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या.
विभागीय आयुक्त केंद्रेकर यांनी लंपी स्कीन डिसिज आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यास प्राधान्य द्यावे. प्रयोगशाळा अद्यावत करण्यासाठी प्रस्ताव सादर करावेत, अशा सूचना अधिकाऱ्यांना केल्या.