सेलू, राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत महसूल विभागाकडून स्वस्त धान्य दुकानातून शेतकरी कुटुंबास दिला जाणारा गव्हाचा पुरवठा झाला नसल्याने ऑगस्ट महिन्यापासूनचा गहू तूर्त बंद करण्यात आला आहे. मात्र इतर लाभार्थ्यांना नियमित धान्य वितरण होईल, अशी माहिती तहसीलदार दिनेश झांपले यांनी दिली आहे.

          राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत शेतकरी कुटुंबातील प्रत्येक माणशी ३ किलो गहू आणि २ किलो तांदूळ वितरित करण्यात येत होता. सेलू तालुक्यात शेतकरी कुटुंब लाभार्थी संख्या २४ हजार ७१९ अशी आहे. यासाठी लागणारा गहू भारतीय महामंडळाकडून सध्या उपलब्ध होणार नसल्याचे कळविण्यात आले आहे. मात्र लाभार्थ्यांना २ किलो तांदूळ वितरित केला जाईल.

         सेलू तालुक्यात अंत्योदय योजनेचे लाभार्थी संख्या २२ हजार ८८३ असून यांना दरमहा १५ किलो गहू आणि २० किलो तांदूळ, १ किलो साखर वाटप करण्यात येत असल्याचे पुरवठा विभागाने सांगितले. यासह प्राधान्य कुटुंबातील ९६ हजार १४७ लाभार्थ्यांना माणशी २ किलो गहू आणि ३ किलो तांदूळ वितरित केला जातो. त्याचे वितरण नियमितपणे चालू आहे.